मुंबई : बेस्ट उपक्रमातील ‘दी बेस्ट एम्प्लॉईज को-आॅप. क्रेडिट सोसायटी लि.’या पतसंस्थेतील संचालक मंडळाविरोधात मुंबईच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष आणि सरचिटणीस यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिल्याचे बेस्ट कामगार सेनेने गुरुवारी सांगितले.पतसंस्थेच्या घोटाळ््याबाबत निबंधक कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बेस्ट कामगार सेनेने न्यायालयात धाव घेतल्याचे सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी सांगितले. सामंत म्हणाले की, पतसंस्थेचे ४३ हजार ७३७ सभासद आहेत. संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात आयोजित करायच्या कार्यक्रमांसाठी मंडळाने २० मे २०१५ रोजी बैठक आयोजित केली होती. तेव्हा नव्या मुख्य कार्यालयासाठी आणि नव्या विश्रामगृहासाठी ४० कोटी रुपये मंजूर करण्याच्या प्रस्तावाला एका मिनिटात मान्यता देण्यात आली. यावर सभासदांनी हरकत घेतली. त्यानंतर २६ स्पटेंबर २०१५ला वार्षिक सभा घेण्यात आली. मात्र ती सभासदांनी उधळून लावली. (प्रतिनिधी)
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेत घोटाळा
By admin | Published: February 12, 2016 1:02 AM