Join us

गुप्तदान करण्याच्या नावाखाली व्यावसायिकाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 2:48 AM

गुप्तदान करण्याच्या नावाखाली व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा प्रकार दादरमध्ये गुरुवारी घडला.

मुंबई : गुप्तदान करण्याच्या नावाखाली व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा प्रकार दादरमध्ये गुरुवारी घडला. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.वरळी कदम मार्ग परिसरात अरुण माधव पुराणिक (६५) कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांचा पूजा डेकोरेटरचा व्यवसाय आहे. गुरुवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास दुकान उघडत असताना, एक तरुण त्यांच्याकडे आला. त्याने जवळपास कुठे मंदिर आहे का, याबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने जवळील मंदिराची माहिती दिली. ते दुकानात गेले. तोही त्यांच्यामागे दुकानात गेला. त्याने गुप्तदान करायचे असल्याचे सांगितले. खिशातून पैशांच्या नोटाही काढल्या. गुप्तदान तो सोन्याच्या स्पर्शाने करतो असे सांगत, व्यावसायिकाला त्याच्याकडील सोन्याची अंगठी देण्यास सांगितली. त्यांनीही जवळील अंगठी आणि सोन्याची चेन काढून त्याच्या पुढ्यात ठेवली. त्याने हातचलाखीने ते दागिने पैशांच्या नोटांमध्ये ठेवले. पैसे दानपेटीत टाकण्यास सांगून तो निघून गेला.थोड्या वेळाने पुराणिक यांनी दागिने काढण्यासाठी पिशवी उघडली असता, त्यात दागिने गायब असल्याचे दिसून आले. त्यांनी त्या व्यक्तीचा शोध घेतला मात्र ती व्यक्ती दिसून आली नाही.अखेर यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शिवाजी पार्क पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.

टॅग्स :धोकेबाजी