लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - नाशिकच्या विष्णू भागवत व प्रफुल्ल नेस्ताने यांनी गुंतवणूकदारांना आमिष दाखविण्यासाठी पाच वर्षांत १४ कंपन्या बनवून मुंबईसह राज्यभरातील नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी ऑगस्ट २०१५ मध्ये उज्ज्वलम ॲग्रो मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या कंपनीची सुरुवात करून ३ वर्षे, ५ वर्षांसाठी मुदत ठेवी, पेन्शन योजना, विविध प्रकारच्या ठेवी योजनांच्या जाहिराती व साखळी पद्धतीने सभासद नोंदणी केली. सुरुवातीची दोन वर्षे परतावा देत राहिले. त्यादरम्यान माऊली मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, संकल्पसिद्धी प्रॉडक्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, फ्लाय हॉलिडे प्रायव्हेट लिमिटेड, स्काय फिलर्स, प्रॉफिट टीचर, इन्फिनिटी टूरिझम अशा वेगवेगळ्या नावांच्या १४ कंपन्या बनवून गुंतवणूकदारांकडून सुमारे साठ कोटींच्या ठेवी जमवल्या. मात्र, त्यानंतर कार्यालये बंद केली. त्यानंतर दोन वर्षांपासून एकाही गुंतवणूकदाराला परतावा न देता पसार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन आदर्श इन्व्हेस्टर ॲण्ड डिपॉझिटर वेल्फेअर फोरम बनविला आहे. त्याच्यामार्फत गेल्या वर्षी जूनमध्ये मुंबईतील फसवणुकीबद्दल आर्थिक गुन्हे शाखेकडे सर्व पुराव्यांनिशी तक्रार नोंदविली आहे. मात्र, अद्याप काहीही कारवाई न झाल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.
-------
आकर्षक परताव्याच्या आमिषाने त्यांच्या विविध कंपन्यांमध्ये अनेकांनी ५० हजारांपासून एक कोटीपर्यंतची गुंतवणूक केली आहे. आतापर्यंत फोरमकडे १२ हजारांवर पीडितांची नोंद झाली असून ही संख्या दीड लाखांवर आहे. आम्ही पोलीस व न्यायालयात हक्कासाठी लढा देत आहोत.
-अनंत गोरे (सरचिटणीस, आदर्श इन्व्हेस्टर व डिपॉझिट वेल्फेअर फोरम, मुंबई)