लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : डॉक्टरांची जवळपास ५९ लाखांची फसवणूक करणारा ओपेक्स ट्रॅव्हल्सचा मालक विनायक झारेकरच्या भावाकडून पोलिसांनी दोन लाख रुपये हस्तगत केले आहेत. कर्ज फेडण्यासाठी फसवणूक केल्याचे तसेच सर्व रक्कम खर्च केल्याचे त्याने अधिक चौकशीअंती दहिसर पोलिसांना सांगितले. हाँगकाँगमध्ये वैद्यकीय परिषदेसाठी निघालेल्या मालाड मेडिकल असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ६४ डॉक्टरांची फसवणूक झारेकरने केली. ज्यामुळे या डॉक्टरांसह त्यांच्या कुटुंबीयांनादेखील प्रचंड मनस्ताप सोसावा लागला. त्यानुसार या प्रकरणी या दोन्ही असोसिएशननी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी झारेकरला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या जबाबात डॉक्टरांकडून घेतलेले सर्व पैसे त्याने खर्च केले. त्यातील काही रक्कम त्याने काढलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरली. काही खर्च केले तर काही नातेवाइकांना दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांची चौकशी सुरू केली. ज्यात त्याच्या एका भावाकडून जवळपास दोन लाखांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. यापूर्वी त्याच्याकडून ५ लाख ६२ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.
कर्जफेडीसाठी केली डॉक्टरांची फसवणूक
By admin | Published: June 01, 2017 3:51 AM