बनावट जाहिरातींद्वारे फसवणूक
By Admin | Published: June 15, 2014 01:26 AM2014-06-15T01:26:18+5:302014-06-15T01:26:18+5:30
कार विक्रीची जाहिरात देऊन लोकांची फसवणूक करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये तीन नायजेरीयन व्यक्तींचा समावेश आहे
नवी मुंबई : कार विक्रीची जाहिरात देऊन लोकांची फसवणूक करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये तीन नायजेरीयन व्यक्तींचा समावेश आहे. खारघर येथे एका घरावर छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
घरबसल्या आर्थिक व्यवहार करायची चटक लागलेल्या व्यक्तींना या फसव्या जाळ्यात ही टोळी अडकवत असे. क्विकर, ओएलएक्स अशा वेबसाईटवर कार विक्रीची जाहिरात देऊन ही टोळी लोकांची फसवणूक करत असे. तशा प्रकारच्या तक्र ारी गुन्हे शाखा पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानुसार तपास पथकाने खारघर सेक्टर ३२ मधील साई हिरा पार्क सोसायटीतील एका घरावर छापा टाकला. यावेळी घरामध्ये बेन नुवॉचीक बेनार्ड (३२) व फ्रेयांक झेप झुमा (३४) या मूळच्या नायजेरीयन व्यक्ती आढळून आल्या. तसेच घरामध्ये रोख ७0 हजार रु पये, दोन लॅपटॉप, १५ मोबाईल व ११ वेगवेगळ्या कंपन्यांचे सिमकार्ड आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडे पासपोर्ट व व्हिजाची चौकशी केली असता त्यांच्याकडे ते आढळून आले नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे आढळलेल्या साहित्याच्या आधारे पोलिसांनी अधिक तपास केला असता ते नागरिकांची फसवणूक करत असल्याचे उघड झाले. तर त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांचा साथीदार कारा इमेक पीटर (३६) आणि रेविन राजकुमार नाडार (१९) या दोघानाही अटक करण्यात आली आहे. या चौघांवर परकीय नागरिक कायदा व फसवणूक प्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेन हा या गुन्ह्यातील प्रमुख सूत्रधार आहे. नायजेरीयाचा रहिवासी असलेला कारा व तामिळनाडूचा रहिवासी असलेला रेवीन हे दोघे वेबसाईटवर कस्टमच्या गाड्या विकायच्या असल्याच्या बनावट जाहिराती द्यायचे. या जाहिरातीला भुलून कार घेण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्तींकडून ते ठराविक रक्कम बँक खात्यामध्ये मागवून घेत असत. यासाठी त्यांनी मोरे इंटरप्रायझेस, एम. के इंटरप्रायझेस. मरडीयन इंटरप्रायझेस, हिप्पो इंटरप्रायझेस तसेच रवींद्र या नावाच्या विविध खात्यांचा वापर केला आहे.
परदेशातून आपले पैसे येणार असून ते खात्यात वटवल्यास १५ टक्के रक्कम देवू असे सांगून इतरांची बँक खाती ते वापरत असत. त्यांच्या या जाहिरातबाजीला भुलून खारघर परिसरातून त्यांनी ३ लाख ३३ हजारांची तर राबोडी परिसरातून ४ लाख ८0 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. (प्रतिनिधी)