‘क्लर्क’च्या नोकरीसाठी गंडवले, आयुक्तांच्या नावे डीडीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 01:50 PM2023-08-13T13:50:52+5:302023-08-13T13:51:33+5:30
तरुणाला लावला लाखोंचा चुना, दोघांवर गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कोरोनादरम्यान पालिकेत भरतीच्या जाहिरातीचा गैरफायदा घेत लिपिकपदी नोकरीचे आमिष दाखवत महेश फाले (२९) या तरुणाला लाखोंचा चुना लावण्याचा प्रकार चेंबूरमध्ये घडला. आरोपीने यात पालिका आयुक्तांना डिमांड ड्राफ्ट द्यावा लागेल, असेही सांगितले. त्यानुसार या प्रकरणी गोवंडी पोलिस ठाण्यात धाव घेत सुनील क्षेत्रे आणि पालिका कर्मचारी असल्याचा दावा करणाऱ्या सावंत याच्या विरोधात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार महेश हे मोबाइल रिपेरिंगचे काम करत असून त्यांचे वडील शिवराम हे २०१८ पासून बेलापूर येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. ज्यांचे २०२१ रोजी निधन झाले. महेश यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, वडिलांसोबत काम करणारे नितीन पाटणे यांनी क्षेत्रे नावाच्या व्यक्तीने पालिकेमध्ये नोकरीला लावतो, त्याने माझा मुलगा अजय यालाही घनकचरा खात्यात गाडीवर कामाला लावल्याचे वडिलांना सांगितले होते. पाटणेने अजयचे ओळखपत्रही त्यांना दाखवले आणि ऑगस्ट २०२० रोजी फोनवर क्षेत्रेची ओळख त्यांच्याशी झाली.
शिवराम यांनी महेशची कागदपत्रे व्हॉट्सॲपवर पाठवली. तुमचा लिपिक पदासाठीचा फॉर्म मी भरला असून तुम्हाला पोलिस पडताळणीचा मेसेज येईल असेही सांगण्यात आले. त्यानुसार तो मेसेज आला. सुरुवातीला ५० हजारांचा धनादेश शिवराम यांच्याकडून घेऊन क्षेत्रे पालिकेचे बोगस कागदपत्र त्यांना देत होता. त्यानंतर त्याने सावंत नावाच्या व्यक्तीची ओळख करून दिली.
परीक्षा न देताच कामाला लावले...
पाटणेच्या मुलाला कोणतीही परीक्षा न देता कामाला लावले आणि त्यांच्याकडून पैसे घेतले. मात्र तुमच्या मुलाला लिपिक पदावर लावणार आहे आणि त्याची परीक्षा घेऊन सीएसटी ऑफिसमध्ये मुलाखत झाल्यावर मग निवड केली जाईल असे क्षेत्रेने सांगितले. दिलेली रक्कम भत्त्याच्या स्वरूपात परत मिळेल असेही म्हणाला.
दारूच्या बाटल्या आणि रक्कम
क्षेत्रे याने सावंतच्या हाताखाली काम करण्याचे महेशला सांगत १० हजारांची मागणी केली. मात्र पैसे नसल्याने त्यांच्याकडून दारूच्या बाटल्या, ८ हजार घेतले.
पीपीई किट!
क्षेत्रे याने महेश यांना एक यादी दिली. ज्यात त्यांच्यासह १४ ते १५ मुलांची नावे होती. कोविडमुळे पीपीई किटसाठी आणि ओळखपत्रासाठी प्रत्येकी ५ हजार असे १५ हजार द्यायला लावले. क्षेत्रेने २२ एप्रिलपासून महेशना कामावर रुजू व्हा, पण त्यापूर्वी पालिका आयुक्तांना ५ हजार ४०० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट द्यावा लागेल असे सांगत ६ हजार घेतले.
दागिने गहाण ठेवून कर्ज काढत नोकरीच्या आशेने आम्ही पैसे भरले. कोरोना काळात वॉर्डमध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश नव्हता. त्यामुळे सावंतबाबत अधिकृत माहिती काढणे शक्य झाले नाही आणि मी फसलो. - महेश फाले, तक्रारदार