तरुणाच्या खात्यातील रकमेवर अमेरिकेतून डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 09:41 AM2023-10-09T09:41:27+5:302023-10-09T09:44:23+5:30
यामध्ये त्याच्या खात्यातून एकूण १ लाख ९ हजार रुपये गायब झाले आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिस अधिक तपास करत आहेत.
मुंबई : मुलुंडमधील एका तरुणाच्या खात्यातील रक्कमेवर अमेरिकेतून डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये त्याच्या खात्यातून एकूण १ लाख ९ हजार रुपये गायब झाले आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिस अधिक तपास करत आहेत.
तक्रारदार यांचा कॉम्प्युटर हार्डवेअरचा व्यवसाय आहे. १ ऑक्टोबरच्या रात्री त्यांना बॅंक ऑफ बडोदाच्या ग्राहक सेवा केंद्रातून कॉल आला. त्यांनी खात्यातून झालेल्या आंतरराष्ट्रीय व्यवहाराबाबत विचारणा केली. तक्रारदार यांच्या बॅंक खात्याचे डेबिट कार्ड अमेरिकेत स्वाईप करत ही रक्कम लंपास करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले.
- कधीही अमेरिकेला गेले नसताना किंवा डेबिट कार्ड, बॅंक खाते याची गोपनीय माहिती कोणालाही दिली नसताना खात्यातून रक्कम गेल्याने तक्रारदार यांना धक्का बसला.
- सायबर ठगाने त्यांच्या बॅंक खात्याच्या डेबिट कार्डची गोपनीय माहिती चोरी करून इंटरनेट व संगणकीय माध्यमांचा वापर करत ही फसवणूक केली होती.
- याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.