Join us

एअरटेलचा ‘व्हीआयपी’ नंबर देण्याचे सांगत फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 4:06 AM

तिघांना सायबर सेलकडून अटक : गावठी कट्टा हस्तगतलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एअरटेलचा व्हीआयपी मोबाइल नंबर मिळवून देतो ...

तिघांना सायबर सेलकडून अटक : गावठी कट्टा हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एअरटेलचा व्हीआयपी मोबाइल नंबर मिळवून देतो असे आमिष दाखवत लुबाडणाऱ्या टोळीचा उत्तर मुंबई सायबर सेलने पर्दाफाश करत तिघांना शनिवारी पकडले आहे. देशभरात या लोकांनी अशी फसवणूक केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

संतोष गुप्ता, प्रेशित नार्वेकर आणि झैन खान अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळक्याने व्हॉट्सॲप तसेच ईमेलद्वारे अनेकांना मेसेज पाठवत ते एअरटेलमधून बोलत असल्याचे भासवत त्यांचा विश्वास संपादन करत त्यांना व्हीआयपी क्रमांक मिळवून देण्याचे आमिष दिले. त्यानुसार एका व्यक्तीने भारती एअरटेलच्या आयडीएफसी फर्स्ट बँकेत पैसा जमा करण्यास सांगितले. तक्रारदाराने त्यानुसार ३ लाख ३३ हजार १९ रुपये जमा केले. मात्र त्यानंतरही त्यांना व्हीआयपी क्रमांक मिळाला नाही आणि त्यांचे पैसेही परत करण्यात आले नाहीत. तक्रारदाराने याप्रकरणी समतानगरच्या सायबर सेल विभागात तक्रार केली. या विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक अनुराधा पाटील आणि पोलीस निरीक्षक मंगेश देसाई यांनी गुप्ता आणि नार्वेकरला कांदिवलीतून अटक केली. गुप्ताच्या अंगझडतीत पोलिसांना एक गावठी कट्टा, १० एटीएम, ८ सिमकार्ड, सहा मोबाइल पोलिसांना सापडले. त्यांच्या चौकशीतून मुख्य आरोपी खान याला अटक करण्यात आली. या टोळक्याने अजून १५ लाख ८८ हजारांची फसवणूक केल्याचे उघड झाले असून, या विभागाच्या प्रमुख सरला वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.