ताडदेवमधील सोने व्यापाऱ्याची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:16 AM2021-01-08T04:16:56+5:302021-01-08T04:16:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ताडदेवमधील सोने व्यापाऱ्याला सोनसाखळ्या खऱ्या असल्याचे सांगून कर्ज घेत सव्वा लाख रुपयांची फसवणूक केली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ताडदेवमधील सोने व्यापाऱ्याला सोनसाखळ्या खऱ्या असल्याचे सांगून कर्ज घेत सव्वा लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी बुुधवारी गुन्हा दाखल करून ताडदेव पोलीस तपास करत आहेत.
ताडदेवमधील तक्रारदार सोने व्यापाऱ्याचे साने गुरुजी रोड परिसरात ज्वेलर्स दुकान आहे. सोने, चांदी खरेदी-विक्री करणे आणि गहाण ठेवणे असा व्यवसाय ते करतात. १६ नोव्हेंबरच्या दुपारी त्यांच्या दुकानात एक व्यक्ती आला. त्याने आपले नाव राहुल शहा उर्फ रिंकल असल्याचे सांगून २३ कॅरेटची २५ ग्रॅम ५०० मिली. वजनाची सोनसाखळी गहाण ठेवायची असल्याचे सांगितले. त्यांनी सोनसाखळीची पावती मागितली. पावती गहाळ झाली असल्याचे सांगत गावी घराच्या बांधकामासाठी पैसे घेऊन जायचे आहे. घराचे काम झाल्यानंतर घेतलेले पैसे व्याजासह परत करेन, असे सांगितले. या वेळी दुकानात ग्राहक जास्त असल्याने जैन यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून सोनसाखळी गहाण ठेवत ७२ हजार रुपये कर्ज दिले.
पैसे घेऊन तो व्यक्ती निघून गेला. सायंकाळी गहाण सोने पॅकिंग करते वेळी त्यांनी सोनसाखळी तपासली असता ती नकली असल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी ठगाने दिलेल्या मोबाइलवर संपर्क साधला असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. ठगाने यापूर्वी गहाण ठेवलेल्या सर्व सोन्याच्या वस्तू तपासल्या असता २१ फेब्रुवारीला धवल व्होरा नावाच्या व्यक्तीने गहाण ठेवलेली १८ ग्रॅम १०० मिली. वजनाची सोनसाखळी बनावट असल्याचे उघड झाले.
त्याने सोनसाखळी गहाण ठेवून ४५ हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यानेही जैन यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. जैन यांनी चौकशी केली असता दोघांनीही दिलेले पत्तेसुद्धा खोटे असल्याचे स्पष्ट झाले. यात फसवणूक झाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.