गौरी टेंबकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कर्ज मिळवून देण्याचे सांगत चौघांकडून कागदपत्र घेत अमित माळकर आणि अभिषेक जयस्वाल या भामट्यांनी त्यांना ३ लाख १५ हजार ८६० रुपयांचा चुना लावला. याप्रकरणी अजय मिश्रा (४८) या व्यक्तीने बोरिवली पोलिसात तक्रार दिल्यावर भारतीय दंड संहिता कलम ४०६,४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हात गाडीवर मलाई (चीक) विकणाऱ्या मिश्रा यांची ग्राहक म्हणून आलेल्या माळकरशी ओळख झाली होती. मिश्रा यांना कर्ज झाल्याने ते फेडण्यासाठी त्यांना पैशाची आवश्यकता होती. ही बाब त्यांनी माळकरला सांगितली तेव्हा मी फोनवर लोन काढून देतो असे तो म्हणाला. त्यानंतर त्याने बोरिवली स्टेशन जवळ क्रोमा शोरूममध्ये मिश्रा यांना बोलावले. त्या ठिकाणी जयस्वाल हा आयडीएफसी बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगत मिश्रा यांना १ लाखाचे कर्ज मंजूर होईल असे सांगण्यात आले. मात्र त्यांचे पॅन कार्ड, आधार कार्ड आणि चेकबुक याचे झेरॉक्स घेत भामट्यांनी स्वतःसाठी दोन मोबाईल फोन घेतले.
या बदल्यात मिश्राना २० हजार रुपये दिले. उर्वरित रक्कमेसाठी बराच पाठपुरावा करून त्यांना पैसे न मिळाल्याने त्यांनी याप्रकरणी क्रोमा शोरूममध्ये जाऊन चौकशी केली. तेव्हा त्यांच्या नावे आरोपींनी कर्ज काढत दोन आयफोन घेतल्याचे उघड झाले. आरोपींनी मिश्रा यांच्यासह ध्रुरवकुमार मौर्य, कुमकुम मिश्रा, विनोद शुक्ला या सगळ्यांची मिळून एकूण ३लाख १५ हजार ८६० रुपयांची फसवणूक केली.