लोकमत न्यून नेटवर्क, मुंबई : सोशल मीडियावर होलसेल दरात जेवणाकरिता गोल्डन थाळीबाबत जाहिरात देवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा डॉ.दा.भ. मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या दुकलीला अहमदाबाद येथून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ तारखेला सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास तक्रारदाराने सोशल मीडियावर होलसेल दारात गोल्डन थाळी अशी जाहिरात पाहिली. दुपारच्या जेवण ऑनलाईन ऑर्डर करायची असल्याने, त्यांनी जाहिरातीत लिंकवरती क्लिक केले. त्यानंतर एक वेबसाईट उघडली. त्यांनी, रेस्टॉरंट गोल्डन स्टार थाळी या ऑप्शनवर क्लिक केले. तेथे एक फॉर्म ओपन झाला. फिर्यादी यांनी ५० रुपये किमतीला डिस्काउंटमध्ये थाळी भेटत असल्याने स्वत:ची नाव, पत्ता, मोबाईल नंबर व क्रेडीटकार्ड नंबर ही माहिती त्यात भरली व माहिती सबमीट केली. थाळीचे ५० रुपये पाठविण्यासाठी आलेला ओटीपी देखील भरला. त्यानंतर तक्रारदार यांच्या क्रेडीट कार्ड मधुन ३८ हजार रुपये वजा झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय घारेपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी जितेंद कदम, नितीन महाडिक, तुकाराम डिगे, अभिजीत देशमुख, पोलीस अंमलदार सचिन घुगे, सुरज धायगुडे, चैतराम पावरा, मुन्ना सिंग यांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपासात गुजरात कनेक्शन उघड होताच पथकाने गुजरातला धाव घेतली.
गुन्ह्यातील सोशल मीडियावर जाहिरातीची लिंक पाठविणारा मुख्य आरोपी इरफान बिस्मिल्लाखान मलिक, (३५) यांच्यासह बँक खाते हॅण्डलर फैजान इस्माईल मोदन (३०) या दोघांना अटक केली. या दुकलीने आतापर्यंत अनेकांना अशाप्रकारे गंडविल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.