Join us

तुमची गाडी कुठे काय करते? ‘पे अँड पार्क’मध्ये फसवणूक, सुपरवायझरवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 7:23 AM

होय, असा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई ( Marathi News ): रस्ते आणि वाहने यांचे व्यस्त गुणोत्तर असलेल्या मुंबई महानगरात तुम्ही गाडी घेऊन गेलात की, ती नेमकी लावायची कुठे, हा प्रश्न उभा ठाकतो. अशावेळी ‘पे अँड पार्क’ अशी नागरिकस्नेही योजना तुम्हाला मदतीचा हात देते. पार्किंगचा प्रश्न सुटल्याने तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडून ‘पे अँड पार्क’च्या पर्यवेक्षकाकडे मोठ्या विश्वासाने गाडी सोपवतात. अर्थात त्यासाठी तुम्ही तासाला २०० रुपये मोजता. पण आपली गाडी सुरक्षित आहे, याची हमी तुम्हाला असते. मात्र, या हमीला तडा जातो तेव्हा? तुमची गाडी भलत्याच ठिकाणी आणि तीही ‘नो पार्किंग झोन’मध्ये लावली असल्याचा संदेश तुमच्या मोबाइल स्क्रीनवर झळकतो तेव्हा?, होय, असा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

एका सद्गृहस्थांनी दोन तासासाठी आपली गाडी क्रॉफर्ड मार्केटसमोरच्या ‘पे अँड पार्क’ मध्ये लावली. त्यासाठी सुपरवायझर मोहसीन शेख यांच्याकडे गाडीची चावी सुपूर्द केली. गाडी पे अँड पार्कमध्ये दिल्यानंतर निर्धास्त झालेल्या त्या सद्गृहस्थांना तुमची गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरील गल्लीत ‘नो पार्किंग’ क्षेत्रात लावल्याचा संदेश प्राप्त झाला. तसेच दंडाचे ई-चालानही मिळाले. त्यांना ते पाहून धक्काच बसला. वाहतूक पोलिसांनी या सदगृहस्थांशी संपर्क साधला असता त्यांना वस्तुस्थिती समजली. शेख यांनी ‘पे अँड पार्क’ साठी २ तासांचे ४०० रुपये घेतले होते. तरी गाडी ‘नो पार्किंग झोन’मध्ये आल्याने शेख यांनी त्यांची फसवणूक केल्याचे चौकशीत समोर आले. 

तत्काळ दखल...

वाहतूक विभागाचे सहपोलिस आयुक्त प्रवीण पडवळ यांना ही बाब समजताच त्यांनी तात्काळ गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, वाहतूक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक किरण अभिमान पवार (५२) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे. आझाद मैदान पोलिस तपास करत आहेत.

परवाना रद्दसाठी पालिकेकडे पाठपुरावा

‘पे अँड पार्क’च्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने वाहने पार्क करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. संबंधित ‘पे अँड पार्क’ विरोधात यापूर्वीही तक्रार आली होती. सुपरवायझरविरोधात पोलिस कारवाई करण्यात आली आहे. तसेच परवाना रद्द होण्याबाबत पालिकेकडे पाठपुरावा केल जाईल. - प्रवीण पडवळ, सहपोलिस आयुक्त, वाहतूक, मुंबई पोलिस. 

टॅग्स :आरटीओ ऑफीस