मुंबई: अंधेरी परिसरात राहणारे रामशंकर मोरया (३३) यांना ११ ऑक्टोबर रोजी फेसबुकवर ट्रॅक्टर विक्रीची फसव्या जाहिरातमुळे ८३ हजार ६७ रुपयांचा फटका बसला. विक्रेत्याने स्वतःची ओळख आर्मी जवान म्हणून केली होती. फर्निचर खरेदी, घर भाड्यावर घेणे, मुलांना शिकवणी साठी प्रवेश घेणे अशा अनेक कार्यपद्धती वापरल्यानंतर आता हे भामटे आर्मी जवान वाहनविक्रीचा बहाणा करत फसवणूक करू लागले आहेत. त्यानुसार अंधेरी पोलिसानी याप्रकरणी गुन्हा दाखल करवला आहे.
मोरया यांनी अंधेरी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची फसवणूक करणाऱ्या भामट्याने स्वतःचे नाव कार्तिक जैन सांगत तो आर्मीचा जवान असल्याचे भासवले. तसेच त्याची इंदोरमधून बदली होणार असल्याने त्याला १.६० लाखाला त्याचा ट्रॅक्टर विकायचे असल्याचे मोरया यांना सांगितले. त्यानंतर पेटीएम वरून क्यू आर कोड पाठवत वेगवेगळी कारणे देत ८३ हजार रुपयांची रक्कम उकळत त्यांचा फोन उचलणे बंद केले. या विरोधात त्यांनी सायबर सेलच्या १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार केली होती. नंतर २२ ऑक्टोंबरला पुन्हा ट्रॅक्टरची उर्वरित रक्कम वीरेंद्रसिंह प्रताप नावाच्या व्यक्तीने त्यांच्याकडून मागली. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर मोरया यांनी या विरोधात अंधेरी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल करवला.