दोघांविरोधात गुन्हा दाखल
मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
दोघांविरोधात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पालघरच्या तरुणाची तीन लाखांना फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पालघर येथील रहिवासी असलेले मंगेश पाटेकर (वय ३६) याच्या तक्रारीवरून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पाटेकर हा नोकरीच्या शोधात असताना गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कामानिमित्त मंत्रालयाच्या परिसरात आला, यावेळी त्याचा मित्र किरण महाडिक ऊर्फ बंटीसोबत भेट झाली. त्याने त्याचे कार्ड दाखवले. त्यावर भारत सरकार असे लिहिले होते. यावेळी पाटेकरने त्याच्याकडे नोकरीबाबत विचारणा करताच बंटीने त्याचा साथीदार सिद्धार्थ दुधवडकर याचा मोबाईल नंबर दिला. पुढे या दोघांनीही मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी पाच लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे सांगितले. तडजोडीअंती तीन लाख रुपयांत नोकरी लावून देण्याचे ठरले. त्यानुसार तरुणाने त्याला नोव्हेंबरमध्ये पैसे दिले. मात्र पैसे देऊनही बरेच दिवस उलटले तरी नोकरी मिळत नसल्याने अखेर शुक्रवारी (दि. २२) पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
........................