मुंबई : कर्ज देण्याचे आमिष दाखवत मालाडच्या एका व्यावसायिकाची जवळपास ३ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मनीष शर्मा (२२) या कॉल सेंटर चालकाला दिल्लीतून अटक केली. त्याचा मोबाइलही हस्तगत करण्यात आला आहे.
शर्मा हा दिल्लीत कॉल सेंटर चालवतो. त्याने काही दिवसांपूर्वी मालाडच्या सुमित भन्साली यांना फोन करत “तुम्हाला कर्ज हवे आहे का?” अशी विचारणा केली. भन्साली यांना काही कामासाठी १२ लाखांची गरज असल्याने त्यांनी शर्माला होकार दिला. त्यानंतर त्यांना पुन्हा शर्माने फोन करीत कर्जासाठीच्या प्रक्रियेसाठी २ लाख ८० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार भन्साली यांनी ते पैसे शर्माने सांगितलेल्या खात्यात पाठविले. मात्र पैसे दिल्यानंतर शर्माचा फोन बंद झाला आणि आपली फसवणूक झाल्याचे भन्साली यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी मालाड पोलिसांच्या सायबर सेलमध्ये याबाबत तक्रार दाखल केली.
या सेलचे प्रमुख विवेक तांबे यांनी तपास सुरू केला तेव्हा शर्माचे बँक खाते हे सिंडिकेट बँकेच्या दिल्ली परिसरातील निघाले. त्यानुसार त्यांचे पथक दिल्लीला रवाना झाले आणि त्यांनी शर्माच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या आणखी एका साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.