मुंबई : काळाचौकी परिसरात एका ठगाने मेडिकल मालकाला औषधे आणि दहा हजार रुपयांना गंडा घातला. डॉक्टरच्या नावाने औषधे व दहा हजार रुपयांचे सुटे पैसे आणण्यास सांगत मेडिकल मालकाची फसवणूक केली. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला. ४७ वर्षीय फार्मसी डायरेक्टरच्या तक्रारीवरून पोलीस अधिक तपास करत आहेत.
त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १९ जुलै रोजी मेडिकलमधील मोबाईल क्रमांकावर डॉ. रॉय नावाने कॉल आला. येथीलच अमेय बिल्डिंगमध्ये क्लिनिक आहे. त्यामध्ये काही वस्तूंची आवश्यकता असल्याचे सांगत बिलासह १० हजार रुपयांचे सुटे पैसे देण्यास सांगितले. त्यानुसार डिलिव्हरी करणारा बॉय मंगेश सामानाची डिलिव्हरी आणि १० हजार रुपये घेऊन दवाखान्यात गेला. तिथे बाहेरच उभ्या असलेल्या तरुणाने तो कंपाउंडर असल्याचे सांगितले. तसेच त्याने सुटे पैसे घेत त्याला इमारतीच्या चौथ्या मजल्यावर डॉक्टर आहेत, त्यांच्याकडून पैसे घेण्यास सांगितले. मात्र मंगेशने चौथ्या मजल्यावर धाव घेताच, तेथे कोणीही राहत नसल्याचे लक्षात आले. घडलेला प्रकार मेडिकल चालकाला समजताच त्यांना धक्का बसला.
त्यांच्या दुकानाशेजारी असलेल्या डॉ. रॉय यांच्याकडे जाऊन चौकशी केली असता त्यांनी कुठलीही ऑर्डर दिली नसल्याचे सांगितले. मेडिकल मालक आजारी असल्याने तक्रार केली नाही, अखेर याप्रकरणी शनिवारी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.