...या लिंकवर क्लिक करा; तुम्हाला म्हाडाचे घर लागेल, सोशल मीडियावर धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 12:36 PM2023-05-05T12:36:18+5:302023-05-05T12:36:37+5:30
समाजमाध्यमे नागरिकांना विशिष्ट लिंक पाठवून क्लिक करण्याबाबत सूचित करीत आहेत.
मुंबई - म्हाडाच्या लॉटरीच्या अनुषंगाने अनेक समाजमाध्यमे, अनधिकृत संकेतस्थळांवर मुंबई मंडळाच्या येऊ घातलेल्या सोडतीबाबत म्हाडाचे बोधचिन्ह अनधिकृतरीत्या वापरून म्हाडाच्या प्रकल्पांची, त्यांच्या आकारमानाची, किमतीची अवास्तव माहिती प्रसिद्ध केली जात आहे. त्यामुळे अर्जदारांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. परिणामी सोडत प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळांवरूनच अर्जाची नोंदणी करून सोडत प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन म्हाडाने केले आहे.
कोणत्याही समाजमाध्यमांची, त्रयस्थांची, संस्थांची अथवा इतर मध्यस्थांची मदत म्हाडातर्फे घेण्यात आलेली नाही. समाजमाध्यमे नागरिकांना विशिष्ट लिंक पाठवून क्लिक करण्याबाबत सूचित करीत आहेत. म्हाडातर्फे कोणतेही व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करण्यात आलेले नाहीत अथवा कोणत्याही संकेतस्थळाला माहिती देण्यात आलेली नाही आणि अशा प्रकारे प्राप्त झालेल्या ग्रुप्स अथवा संकेतस्थळावर जोडण्याकरिता प्राप्त झालेल्या लिंकवर सहभाग घेऊ नये. कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये तसेच कोणताही आर्थिक व्यवहार करू नये. या माध्यमातून नागरिकांची फसवणूक झाल्यास अथवा इतर कोणत्याही व्यवहारास मंडळ अथवा म्हाडा प्रशासन जबाबदार राहणार नाही. ॲप्लिकेशन उपलब्ध अण्ड्रॉइड मोबाइलवर प्ले स्टोर आणि ॲपल मोबाइल फोनवर ॲप स्टोरमध्ये सोडतीचे ॲप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सदनिकांच्या विक्रीकरिता दलाल नेमलेले नाहीत. अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर आर्थिक व्यवहार करू नये. प्रलोभने देऊन फसवणूक करीत असल्याचे आढळल्यास त्यांनी म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी तसेच उपमुख्य अधिकारी यांना कळवावे. - मिलिंद बोरीकर, मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ, म्हाडा
अधिकृत संकेतस्थळ
सदनिका विक्री व सोडत प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता https://www.mhada.gov.in तसेच https://housing.mhada.gov.in याच म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा.
नोंदणी नि:शुल्क
नोंदणी नि:शुल्क असून, कोणत्याही प्रकारे फी अथवा शुल्काची मागणी केली जात नाही. ज्यावेळेस सदनिका विक्रीकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, त्यावेळेस अर्जदारांना अर्ज रक्कम व अनामत रक्कम भरण्याकरिता लिंक खुली करण्यात येईल. ज्यामध्ये म्हाडाच्या बँक खात्याबाबतची माहिती नमूद करण्यात येईल.
नोंदणी सुरू
सदनिका विक्री सोडतीत सहभागी घेऊ इच्छिणाऱ्यांकरिता नोंदणीची प्रक्रिया अमर्याद सुरू आहे. कागदपत्रांची पूर्तता करून अर्जदार सोडतीत सहभागी होण्याकरिता आपली पात्रता निश्चित करून घेऊ शकतात.