Join us

कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक, चित्रपट दिग्दर्शकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 1:52 AM

चित्रपट दिग्दर्शकाला क्राइम ब्रँचकडून अटक

मुंबई : दिल्लीतील व्यावसायिकाला २०० कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांना लुबाडण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ११ ने एका चित्रपट दिग्दर्शकाला शुक्रवारी अटक केली असून, त्याने अनेकांना अशाच प्रकारे फसविल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

साईनाव स्पिरिट प्रा.लि. कंपनी आणि दिल्लीतील व्यावसायिकाला व्यवसाय वाढविण्यासाठी भांडवलाची गरज होती. त्यासाठी प्रयत्न करत असताना, त्यांची ओळख अजय यादव उर्फ अजय कुमार (५४) या चित्रपट निर्मात्याशी झाली. त्याची अँग्लो इंटरप्रायझेस कंपनी लोनसाठी मदत करेल, असे त्याने तक्रारदाराला सांगितले, तसेच त्यांच्या उत्तर प्रदेश येथील कार्यालयात भेट देऊन त्यांना २०० कोटींचे लोन पास झाल्याचे पत्रही दिले. आरटीजीएस पद्धतीने २० लाख रुपये त्याच्या अँग्लो इंटरप्रायझेस कंपनीच्या बँक खात्यात जमा झाल्यास, पुढच्या काही मिनिटांत २०० कोटी रुपये तक्रारदाराच्या अकाउंटमध्ये जमा होतील, असेही यादवने त्यांना सांगितले. विश्वास ठेवत तक्रारदाराने पैसे पाठविले आणि अजय फोन बंद करून गायब झाला.अंधेरी पश्चिम परिसरातून आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शरद झिने आणि पथकाने त्याला ताब्यात घेतले. यादव हा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून काम करत असून त्याने सहा चित्रपट तयार केले आहेत. भडास, ओव्हरटाइम, लव्ह फिर कभी, रान बनका, सस्पेन्स आणि साक्षी अशी त्यांची नावे असून त्याच्या अनेक वेब सीरिजही चालतात. चित्रपट बनविण्यासाठी पैसा नसल्याने कधी प्रोसेसिंग फी तर कधी अन्य काही कारण देत, लोकांची अशाच प्रकारे फसवणूक केली असल्याचे कक्ष ९ चे प्रमुख चिमाजी आढाव यांनी सांगितले.

टॅग्स :अटक