ऑनलाइन कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली ठगीचा धंदा जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:06 AM2021-07-09T04:06:31+5:302021-07-09T04:06:31+5:30
महाराष्ट्र सायबरकड़ून सावध राहण्याचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनामुळे बेरोजगारी वाढली. यातच जवळील जमापुंजीही संपल्याने अनेकजण कर्ज ...
महाराष्ट्र सायबरकड़ून सावध राहण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे बेरोजगारी वाढली. यातच जवळील जमापुंजीही संपल्याने अनेकजण कर्ज मिळविण्यासाठी धडपड करत आहेत. यातच सायबर ठग ऑनलाइन कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करत असल्याच्या घटना वाढत असल्याचे सायबर पोलिसांच्या निरीक्षणात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्ज घेताना सतर्क राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे.
सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायबर भामटे हे नामांकित वित्तीय संस्था व बँकांच्या नावाने बनावट वेबसाइट बनवून त्यावर कर्जवाटपाबाबत नमूद करण्यात येते. ऑनलाइन कर्ज घेण्यासाठी गुगलवर सर्चिंग करणारी मंडळी अशा वेबसाइटला बळी पडतात. अशा संकेतस्थळावरील संबंधित लिंकवर वैयक्तिक माहिती शेअर करताच, ठग मंडळींकडून कॉल येतो.
कर्ज मंजूर होण्यासाठी प्रोसेसिंग फी भरण्यास सांगत. फी भरताच, लवकरच पैसे खात्यात जमा होणार असल्याचे सांगून कॉल कट होतो. त्यानंतर ठग मंडळीही नॉटरिचेबल होत आहेत. त्यामुळे अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात येत आहे.
काय काळजी घ्याल?
* संकेतस्थळावरील तपशील नेहमी काळजीपूर्वक तपासून घ्या.
* संकेतस्थळ अधिकृत आहे का नाही, याची खात्री करून घ्या.
* कर्जासाठी ज्या नामांकित बँका किंवा वित्तीय संस्थेच्या नावाने संकेतस्थळ आहे, अशा नामांकित बँकिंग वित्तीय संस्थेच्या आपल्याजवळील शाखेत जाऊन ते अशाप्रकारची काही सेवा देत आहेत का, याची माहिती घ्या.
* अधिकृत संकेतस्थळावरूनच व्यवहार करा.
* फसवणूक होत असल्याचा संशय येत असल्यास जवळील पोलीस ठाण्यात तक्रार द्या किंवा सायबर पोलिसांच्या संकेतस्थळावर तक्रार द्या.