लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून राज्यभरातील शेतकरी, मोलकरणींसह उच्चशिक्षितांनाही कोट्यवधींचा गंडा घालणारा मुकेश सूर्यवंशी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. मुंबईसह राज्यभरात त्याच्याविरुद्ध गुन्हे नोंद आहेत. मुकेशने घाटकोपर तसेच वेगवेगळ्या ठिकाणी सुरू केलेल्या कंपन्याही बोगस असून, दिलेली कागदपत्रे बनावट असल्याचे तपासात समाेर आले आहे. खार आणि सांताक्रूझ पोलीस ठाण्यात याचप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.
मुकेशने स्वस्तात सोने खरेदी-विक्रीच्या नावाखाली लोकांना ठगविण्याचा धंदा सुरू केला. कॅनडा येथे नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसेसमध्ये एजंट म्हणून कार्यरत असलेले सत्यानंद गायतोंडे (५३) यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचीही यात फसवणूक झाली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिसरमध्ये त्यांचा फ्लॅट असल्याने ते अधूनमधून मुंबईत ये-जा करतात. २०१३ मध्ये मढ येथे एका सिनेमाच्या सेटवर त्यांची मुकेशसोबत ओळख झाली. फेसबुक, व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून दाेघांमध्ये संवाद सुरू झाला.
२०१६ मध्ये तेे मुंबईत आल्यानंतर मुकेशने त्यांच्याशी संपर्क साधला. मौर्या स्वीस नावाची कंपनी उघडली असून, त्यात बाजारभावापेक्षा १० टक्के कमी दराने सोने आणि त्याची पावती देणार असल्याचे सांगितले. हे सोने बाहेर विकल्यास जास्तीचा नफा मिळेल, असे आमिषही दाखविले. २०१८ मध्ये कामानिमित्त ते पुन्हा मुंबईत आल्यानंतर मुकेशने त्यांची भेट घेतली. बंगळुरूमध्ये सोन्याचा व्यवसाय करण्यासाठी मदत मागितली. गायतोंडे यांनीही १५ लाख ६२ हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यांच्या कुटुंबीयांनीही पैसे गुंतविले. पैसे देऊनही सोने न मिळाल्यामुळे त्यांनी मुकेशकडे विचारणा केली. ताे टाळाटाळ करू लागला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. मात्र ताेपर्यंत मुकेश पसार झाला हाेता. तपास अधिकाऱ्याने दुर्लक्ष केल्यामुळे मुकेश पसार होण्यास यशस्वी झाला, असा आरोप गायताेंडे यांनी केला आहे.
मुंबईत फसवणुकीनंतर दुबईवारीमुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यात फसवणूक केल्यानंतर २०१९ मध्ये मुकेश दुबईला पसार झाला. त्याच्या पासपोर्ट जप्तीचे आदेश असतानाही तो पसार होण्यात यशस्वी झाला होता. गायतोंडे यांनी तेथील पोलिसांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. मुकेशबाबतचा व्हिडिओही दुबईत व्हायरल केला.
अशी केली अटक : मुकेश भारतात येणार असल्याची माहिती गायतोंडे यांनी महाराष्ट्र पोलिसांना दिली. त्यानुसार, तपासाअंती त्याला गोवा विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. तेथून पुणे पोलिसांनी त्याचा ताबा घेत तेथे याचप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक केली. त्यानंतर खार आणि त्यापाठोपाठ सांताक्रूझ पोलिसांनी त्याचा ताबा घेतला. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.