पोलिसांकडून बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: पंचतारांकित हॉटेल, विमानतळावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरचा बुधवारी मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला. 'ताज सॅट्स एअर कॅटरिंग लिमिटेड' च्या व्यवस्थापकाने याप्रकरणी विमानतळ पोलिसांना तक्रार केल्यानंतर ही बाब उघड झाली.
'ताज सॅट्स एअर कॅटरिंग लिमिटेड' चे व्यवस्थापक दिनशा अंकलेश्वरिया यांनी १९ जू्न २०२१ रोजी या प्रकरणी तक्रार दिली. त्याच्या कंपनीच्या नावाने व्हॉट्सॲप व फेसबुकद्वारे मेसेज पाठवून नोकरीचे आमिष दिले जात असल्याचे त्यांचे म्हणणे होते. साकीनाक्यातील युनिव्हर्सल ग्रुपमार्फत एअरलाईन्स ग्रुप तयार करून त्यामार्फत हे मेसेज पोस्ट केले जात होते. तसेच नोकरी देण्याच्या नावे गरजूंकडून दोन ते तीन हजार रुपये उकळले जात होते. सहार पोलिसांनी २२ जून, २०२१ रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर शीलवटे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिव्हर्सल ग्रुपच्या कार्यालयावर छापा टाकला तेव्हा घटनास्थळी सापडलेल्या १३ जणांना अटक करण्यात आली. तसेच संगणक, मोबाईल, हार्ड डिस्क यांसारखे सामानही हस्तगत करण्यात आले असून आरोपींना ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.