Join us

घराचा ताबा देताना वृद्धाची फसवणूक: न्यायालयाने आरोपीचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला

By रतींद्र नाईक | Published: October 16, 2023 9:43 PM

प्रभादेवी येथील एक इमारत विकासकाने पुनर्विकास करण्यासाठी ताब्यात घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: घराचा ताबा देताना परिचयाच्या व्यक्तीने ७७ वर्षीय वृद्धाची फसवणूक केल्याचा प्रकार प्रभादेवी येथे घडला आहे. या प्रकरणी अटक टाळण्यासाठी संबंधित व्यक्तीने मुंबई सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीन अर्ज दाखल केला होता मात्र या प्रकरणाची सविस्तर चौकशी होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करत सत्र न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळून लावला.

प्रभादेवी येथील एक इमारत विकासकाने पुनर्विकास करण्यासाठी ताब्यात घेतली. विकासकाने नवीन इमारत २०१६ साली बांधली व  रमेश सुर्वे (७७) यांना चौथ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ४०१ मिळाला असल्याचे पत्र दिले. मात्र सुर्वे यांच्या परिचयाचे अमर छेडा यांनी तो फ्लॅट निलेश सावंत व संदेश सावंत यांना दिला. तसेच निलेश व संदेश यांच्या नावावर असलेला फ्लॅट क्रमांक ४०४ रमेश सुर्वे यांना दिला. या फसवणूक प्रकरणी अमर छेडा यांच्या विरोधात ना म जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

या प्रकरणी अटक होऊ नये यासाठी अमर छेडा याने मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावर अतिरिक्त न्यायाधीश आर आर पातरे यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. इतकेच नव्हे तर चौकशी शिवाय या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे अर्जदाराला जामीन देता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले.

टॅग्स :धोकेबाजी