Join us

वडिलांची उधारी पाठवतो म्हणत लाखोंची फसवणुक! इंटेरियर डिझायनरची पोलिसात धाव

By गौरी टेंबकर | Published: March 15, 2024 4:48 PM

तुमच्या वडिलांचे नाव संजय सुतार असून मी त्यांच्याकडून साडेबारा हजार रुपये उधार घेतले होते जे त्यांनी मला तुमच्या गुगल पे खात्यावर पाठवायला सांगितले असे त्याने सांगितले.

मुंबई: तुमच्या वडिलांकडून घेतलेले उधारीचे पैसे पाठवतो असे सांगत एका इंटेरियर डिझायनरची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार विलेपार्ले पोलिसांच्या हद्दीत घडला असून या विरोधात अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार संयुक्ता सुतार (२८) या फ्रीलान्स इंटेरियर डिझायनर असून विलेपार्ले परिसरातच राहतात. त्यांना १२ मार्च रोजी राहत्या घरी असताना पंकज शर्मा नावाने एका व्यक्तीने फोन केला. तुमच्या वडिलांचे नाव संजय सुतार असून मी त्यांच्याकडून साडेबारा हजार रुपये उधार घेतले होते जे त्यांनी मला तुमच्या गुगल पे खात्यावर पाठवायला सांगितले असे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने दहा हजार रुपये पाठवल्याचे सांगितले आणि तक्रारदाराने मेसेज चेक केल्यावर त्यांना दहा हजार रुपये क्रेडिट झाल्याचा मेसेज दिसला. फोनवर बोलणे सुरू असताना अजून तुम्हाला अडीच हजार रुपये पाठवतो असे तो म्हणाला आणि त्यावेळी २५ हजार रुपये पाठवल्याचा मेसेज सुतार यांच्या मोबाईलवर दिसला. त्यावर मी चुकून तुम्हाला जास्त पैसे पाठवले असून तुम्ही मला वीस हजार रुपये परत पाठवा असे अनोळखी व्यक्तीने सुतार यांना सांगितले. मात्र  त्याला पैसे परत करण्याच्या नादात जवळपास ९९ हजार ५०० रुपये त्यांच्या खात्यातून काढण्यात आले.  या फसवणूकप्रकरणी सुतार यांनी विलेपार्ले पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीधोकेबाजी