गौरी टेंबकर - कलगुटकर, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: मायग्रेनने त्रस्त असलेल्या पत्नीच्या उपचारासाठी व्यापाऱ्याने गुगलवरून डॉक्टरची अपॉइंटमेंट घेण्याच्या नादात ९९ हजार रुपये गमावले. ज्याची तातडीने त्यांनी तक्रार दाखल केल्यावर काही रक्कम गोठविण्यात आली. तसेच याप्रकरणी महिनाभरा नंतर कस्तुरबा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार अशोक सोनगीरा हे (३९) हे मिरारोडचे रहिवासी असून बोरिवली पूर्व परिसरात त्यांचे घड्याळाचे दुकान आहे. त्यांची पत्नी ममता (३७) यांना मायग्रेनचा त्रास आहे. त्यामुळे प्रसिद्ध न्युरोलिजिस्ट डॉ दिनेश सिंह यांची ॲपॉइंटमेंट घेण्यासाठी त्यांनी गुगलवर त्यांच्या नावाने सर्च केले. तेव्हा त्यांना ८३२९०३३०१४/९१२२२८१०८५५७ या क्रमांकासह त्यांचे संपर्क क्रमांक आणि पत्ता मिळाला. तो क्रमांक त्यांनी डायल केल्यावर डॉकटरची ॲपॉइंटमेंट हवी आहे का? अशी विचारणा त्यांना करण्यात आली. त्यांनी आजच हवी आहे असे म्हटल्यावर आजच्या ॲपॉइंटमेंट फुल असुन तुम्हाला मिळू शकणार नाही असे उत्तर फोनवर असलेल्या व्यक्तीने दिले.
त्यावर सोनगीरा यांनी फारच गयावया केल्याने कॉलरने एक लिंक मेसेज करत त्यावर त्यांना १० रुपये पाठविण्यास सांगितले. सोनगीरा यांनी तसे केल्यावर त्यांच्या खात्यातून ५ रुपये वजा झाले. तसेच पुन्हा काही वेळाने सोनगीरा यांना ॲपॉइंटमेंट मिळणार नाही असे उत्तर दिले गेले. मात्र पत्नीचा त्रास वाढत असल्याने त्यांनी थेट डॉ. सिंह यांचे क्लिनिक गाठत पत्नीवर उपचार करून घेतले. ज्यात त्यांना डॉ. सिंह यांची अशी कोणतीही लिंक नसल्याचेही समजले. तरीही पुन्हा लिंक पाठविणाऱ्याचा फोन आल्यावर तुम्ही फेक आहात असे सांगत व्यापाऱ्यांने फोन कट केला.
तसेच त्यांना आलेली लिंक, अन्य मेसेजमध्ये आपली खासगी माहिती जाईल या भीतीने त्यांनी तेही उडवले. महिनाभरा नंतर त्यांच्या बँक खात्यातून दोन व्यवहारात ९९ हजार रुपये काढण्यात आले. हा प्रकार गेल्या महिन्यात ३० नोव्हेंबर रोजी घडला. तेव्हा त्यांनी बँकेत धाव घेत स्टॉप पेमेंट केले आणि कस्तुरबा पोलिसात धाव घेत अर्जही दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी तातडीने तपास करत त्यांचे ७७ हजार रुपये गोठवले. मात्र बँकेने एफआयआर कॉपी मागितल्याने अजुनही ते पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले नाही. अखेर याप्रकरणी २२ डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"