Join us  

स्टेट बँकेची फसवणूक! ५७ कोटींचा घोटाळा, सप्तश्रृंगी इस्पातवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 10:20 AM

नव्या मशिन्सची खरेदी करण्याचे कारण दाखवत सुरुवातीला कंपनीने स्टेट बँकेच्या नाशिक येथील शाखेतून १० कोटींचे कर्ज घेतले.

मुंबई : बांधकामात वापरल्या जाणाऱ्या लोखंडी सळयांचे उत्पादन करणाऱ्या श्री सप्तश्रृंगी इस्पात प्रा.लि. या मुंबई व नाशिकस्थित कंपनीने स्टेट बँक ऑफ इंडियाची ५७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने मुंबईत कंपनीच्या दोन संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नव्या मशिन्सची खरेदी करण्याचे कारण दाखवत सुरुवातीला कंपनीने स्टेट बँकेच्या नाशिक येथील शाखेतून १० कोटींचे कर्ज घेतले. त्यानंतर, २०१० ते २०१५ या कालावधीमध्ये कंपनीने बँकेकडून वेळोवेळी नियमित कर्ज घेतले. मात्र, २०१५ नंतर कंपनीची आर्थिक अवस्था बिकट झाल्याचे सांगत कंपनीने कर्ज थकवण्यास सुरुवात केली. यानंतर बँकेने कंपनीची तपासणी करण्यासाठी एका चार्टर्ड अकाउंटंट कंपनीकडून अहवाल मागवला. 

या अहवालाच्या माध्यमातून कंपनीने केलेल्या घोटाळ्याची माहिती पुढे आली. या कर्जप्राप्तीसाठी कंपनीने आपल्या मालाची चुकीची माहिती देतानाच किंमतही वाढवून दाखवली होती. कर्जप्राप्त रकमेतून कंपनीने जो व्यवहार केला त्यात कंपनीच्या मालाची आवक-जावक मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दाखवले. 

मात्र, प्रत्यक्षात कोणताही आवक-जावक झाली नाही. हे सारे व्यवहार केवळ कागदोपत्रीच झाल्याचा उल्लेख सीबीआयच्या तक्रारीत करण्यात आला आहे. कंपनीला कर्जापोटी जे पैसे मिळाले त्यापैकी ८ कोटी ६५ लाख रुपये कंपनीने अन्य कंपन्यांसोबत व्यवहार केल्याचे दाखवत प्रत्यक्षात ते पैसे कंपनीच्या संचालकांच्या वैयक्तिक खात्यात फिरवल्याचे तपासणीत दिसून आले. कंपनीचे कर्ज खाते ३ मार्च २०१६ मध्ये थकीत घोषित झाले, रिझर्व्ह बँकेने कंपनीचे कर्ज खाते फ्रॉड म्हणून घोषित केले आहे.