मुंबई: अंधेरी पूर्व परिसरात राहणाऱ्या मीना मिरगुले (४४) यांना मुद्रा लोन मिळवून देण्याच्या नावाखाली ४० लाख २४० रुपयांचा चुना लावण्यात आला. त्यांनी बजाज फायनान्सकडून ३.१५ लाख रुपयांचे पर्सनल लोन घेतले. मात्र त्याच्या व्याजाचा हप्ता अधिक असल्याकारणाने त्या स्वस्त लोनच्या शोधात होत्या. त्यांना १ जानेवारी रोजी फेसबुकवर मुद्रा लोन हे २ टक्के व्याजाने मिळेल अशी जाहिरात दिसल्याने त्यातील मोबाईल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. तेव्हा ५ लाखांचे कर्ज त्यांना २ टक्क्यांवर मिळेल असे सांगत आधार व पॅन कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स मागवण्यात आली.
दुसऱ्या दिवशी त्यांना एक एग्रीमेंट आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना नावाचा फोटो असल्याचे एग्रीमेंट पाठवत प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ४० हजार २४० रुपये उकळले. त्यानंतर फोन उचलणे बंद केले. या विरोधात मिरगुले यांनी अंधेरी पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.