लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भुलेश्वर, मलबार हिल या परिसरात जोहर हकीमुद्दीन भोपाळवाला नावाची व्यक्ती बेस्टची कर्मचारी असल्याचे भासवत वीजग्राहकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. बनावट ओळखपत्र आणि अब्दुल सादिक या बनावट नावाचा आधार घेऊन ताे बेस्ट संबंधित काम करून घेण्यासाठी लोकांकडून पैसे घेत हाेता. त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.
बेस्टकडून याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बेस्ट उपक्रमाने कोणत्याही खासगी व्यक्तीस वीजग्राहकांकडून रोख रक्कम अथवा धनादेश स्वीकारण्यासाठी प्राधिकृत केलेले नाही. अशा प्रकारची घटना आढळल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात, बेस्ट उपक्रमाच्या विद्युत पुरवठा शाखा आणि दक्षता विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत बेस्ट उपक्रमाकडे ८ तक्रारी आल्या असून कुलाबा पोलीस ठाण्यात ३ आणि मलबार हिल येथील पोलीस ठाण्यात २ तक्रारींची नोंद झाली आहे.
.................................