'हाउसिंग पोर्टल' वरून माहिती मिळवत व्यावसायिकांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:06 AM2021-04-14T04:06:49+5:302021-04-14T04:06:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पवईमध्ये एका खासगी कंपनीच्या व्यावसायिकाची ९८ हजार रुपये उकळत फसवणूक करण्यात आली होती. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पवईमध्ये एका खासगी कंपनीच्या व्यावसायिकाची ९८ हजार रुपये उकळत फसवणूक करण्यात आली होती. यातील तक्रारदाराची माहिती आरोपीने हाउसिंग पोर्टलवरून काढल्याचे तपासात उघड झाले असून, पवई पोलीस याबाबत अधिक चौकशी करत आहेत.
पवईतील रहिवासी व व्यावसायिक एस दासगुप्ता (४७) यांना शुक्रवारी सचिन शर्मा नामक व्यक्तीने फोन करत तो बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ)चा जवान असल्याचे सांगितले.
तसेच त्याला कोलकातामधील फ्लॅट भाडेतत्त्वावर हवा असून, त्यासाठी तो ५० हजार रुपये जी पेमार्फत पाठवत असल्याचेही सांगितले. शर्मावर विश्वास ठेवत त्याने पाठविलेली रिक्वेस्ट दासगुप्ता यांनी स्वीकारली आणि त्यांच्या खात्यातील ४९ हजार काढण्यात आले. त्यानंतर पुन्हा ४९ हजार त्यातून कमी झाले. त्यामुळे दासगुप्ता यांनी शर्माला ब्लॉक करत पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी केलेल्या तपासात कथित बीएसएफ अधिकारी शर्मा याने हाउसिंग पोर्टलवरून दासगुप्ता यांची माहिती मिळवली असावी, कारण ही नवी कार्यपद्धती सायबर गुन्हेगार वापरत असून, नागरिकांनी याबाबत सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या गुन्हेगाराचा शोध पवई पोलीस घेत आहेत.