शिपिंग उद्योगात फसवणूक, घोटाळा; राज ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 12:30 PM2024-03-07T12:30:31+5:302024-03-07T12:32:03+5:30
शिपिंग क्षेत्रातील कामगारांनी राज ठाकरे यांनी नुकतीच भेट घेतली. देशातील दोन लाखांहून अधिक सीफेरर्स हे भारतीय आणि परदेशी जहाजांवर कार्यरत आहेत.
मुंबई : शिपिंग क्षेत्रातील दोन लाख भारतीय सीफेरर्सची आर्थिक पिळवणूक आणि फसवणूक होत आहे. शिपिंग उद्योगात मोठ्या प्रमाणावर घाेटाळा सुरू असून केंद्र सरकारने याबाबत तातडीने पावले उचलावीत, अशा आशयाचे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.
शिपिंग क्षेत्रातील कामगारांनी राज ठाकरे यांनी नुकतीच भेट घेतली. देशातील दोन लाखांहून अधिक सीफेरर्स हे भारतीय आणि परदेशी जहाजांवर कार्यरत आहेत. त्यापैकी ४० हजार अधिकारी आहेत, तर १.६ लाख सीमेन (खलाशी) आहेत. भारतातील बहुतांश सीमेन हे ‘नुसी’ या कामगार संघटनेचे सदस्य आहेत. सर्व अधिकारी हे ‘मुई’चे (मेरिटाइम युनिअन ऑफ इंडिया) सदस्य आहेत.
या दोन्ही संघटना भारतातील ‘रिक्रूटमेंट अँड प्लेसमेंट सर्व्हिसेस लायसन्स’ धारक कंपन्यांसोबत ‘कलेक्टिंग बार्गेनिंग ॲग्रीमेंट’वर स्वाक्षरी करतात. गंभीर बाब म्हणजे, या करारावर शिपिंग महासंचालक किंवा अन्य कोणत्याही शासकीय प्राधिकरणाची स्वाक्षरी अथवा अधिकृत मान्यतेची मोहोर नसते, असे राज ठाकरे ठाकरे यांनी पंतप्रधान यांना लिहिलेल्या पत्रात निदर्शनास आणून दिले आहे.