बोगस विक्रेत्यांना बसणार चाप, फार्मासिस्टसाठी ‘एक्झिट’ गरजेची

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 10:08 AM2023-12-25T10:08:35+5:302023-12-25T10:10:42+5:30

भारतीय औषध व्यवसाय परिषदेकडून परीक्षा बंधनकारक. 

Fraud sellers will be fine, an exit is needed for pharmacists in maharshtra | बोगस विक्रेत्यांना बसणार चाप, फार्मासिस्टसाठी ‘एक्झिट’ गरजेची

बोगस विक्रेत्यांना बसणार चाप, फार्मासिस्टसाठी ‘एक्झिट’ गरजेची

मुंबई : औषध विक्रेता (फार्मासिस्ट) होण्यासाठी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची पदविका किंवा पदवी शिक्षण घेणे गरजेचे असते. अनेक विद्यार्थी पदविकेपर्यंत शिक्षण घेऊन महाराष्ट्र राज्य व्यवसाय परिषदेकडे नोंदणी करून नोंदणीकृत औषध विक्रेता होता येत असे, मात्र आता औषधनिर्माणशास्त्रमध्ये पदविका घेणाऱ्यांना परिषदेकडे नोंदणी करण्यासाठी एक्झिट परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या परीक्षेमुळे परराज्यात शिक्षण घेऊन किंवा बोगस प्रमाणपत्र मिळवून औषध विक्री करणाऱ्यांना चाप बसणार आहे.

औषध विक्रेता होण्यासाठी आवश्यक असलेले पदविका किंवा पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्य व्यवसाय परिषदेकडे नोंदणी करून नोंदणीकृत औषध विक्रेता होता येते. मात्र बनावट प्रमाणपत्र तयार करून परिषदेकडे नोंदणी करणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे.

त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात बोगस औषध विक्रेत्यांची साखळी तयार झाली होती. मात्र भारतीय औषध परिषदेने नुकत्याच काढलेल्या आदेशानुसार यापुढे ‘डिप्लोमा इन फार्मसी’ हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोंदणीकृत औषध विक्रेता होण्यासाठी एक्झिट ही परीक्षा देणे बंधनकारक असेल.

 ज्या उमेदवारांनी २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षात डी. फार्मला प्रवेश घेतले आणि २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षांत उत्तीर्ण झाले आहेत अशा उमेदवारांना एक्झिट परीक्षेत उत्तीर्ण होईपर्यंत नोंदणीकृत औषध विक्रेता होता येणार नसल्याचे नमूद केले आहे. 

 डी. फार्म झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलै ते सप्टेंबर २०२४ दरम्यान प्रथम एक्झिट परीक्षा घेण्यात येणार असून परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही भारतीय औषध व्यवसाय परिषदेच्या आदेशात 
नमूद केले आहे.

औषध क्षेत्रातील ज्ञान नसताना, इंग्रजीमध्ये स्वाक्षरी न करता येणारे अनेक जण घरबसल्या अन्य राज्यातून गैरमार्गाने डी. पदविका घेऊन महाराष्ट्र राज्य व्यवसाय परिषदेत फार्मासिस्ट म्हणून नोंदणी करत होते. अशा गैरप्रकारांना आता आळा बसेल. भारतीय औषध व्यवसाय परिषदेने हा निर्णय उशिरा का होईना घेतला. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत आहे. – कैलास तांदळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्टस असोसिएशन

Web Title: Fraud sellers will be fine, an exit is needed for pharmacists in maharshtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.