परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:14 AM2021-01-13T04:14:21+5:302021-01-13T04:14:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बनावट नोकरी करार पत्र देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बनावट नोकरी करार पत्र देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ८ ने ही कारवाई केली असून,
सोमवारी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
कक्ष ८ सहायक पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांना मालाड येथील मॉलमध्ये ‘मुंबई श्री कन्सल्टन्सी’ नावाने सुरू असलेल्या कार्यालयात परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकला. त्यांच्याकडे परदेशात नोकरीसाठी पाठविण्यासंदर्भात कुठलेही परवाने मिळून आले नाहीत. गरीब व गरजू तरुणांना परदेशात चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखविले जाते. सावज जाळ्यात अडकताच ८० ते १ लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडे ४१ भारतीय पारपत्रे, तसेच परदेशातील कंपनीचे बनावट नोकरी करार प्रमाणपत्र, व्हिसा मिळून आला आहे.
त्यानुसार सहा जणांना अटक करण्यात आली असून, अटकेतील सहाही जण पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. मंगळवारी न्यायालयाने त्यांना १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठड़ी सुनावली आहे.