तोतया जवानाकडून विद्यार्थ्याची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:07 AM2021-02-09T04:07:37+5:302021-02-09T04:07:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : तोतया सैन्य दलातील जवानाने एका विद्यार्थ्याला १ लाख २ हजार ५०० रुपयांना गंडा घातल्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तोतया सैन्य दलातील जवानाने एका विद्यार्थ्याला १ लाख २ हजार ५०० रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी फसवणुकीचा सोमवारी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला आहे.
तक्रारदार तरुण सात रस्ता सर्कल परिसरात कुटुंबीयासोबत राहतो. ३ फेब्रुवारी रोजी ओएलएक्सवर त्याने ३० हजार रुपयात आयफोन ११ ची जाहिरात पाहिली. त्याने संबंधित क्रमांकावर फोन करून याबाबत अधिक माहिती घेतली. आरोपीने तो सैन्यदलात असल्याचे सांगून पैशांची गरज असल्याने मोबाइल विकत असल्याचे सांगितले.
तरुणाचा त्याच्यावर विश्वास बसला. त्याने मोबाइल घेण्यासाठी पुढाकार घेतला. ठरल्याप्रमाणे तरुणाने सुरुवातीला ५ हजार पाठविले. त्यानंतर आरोपीने मोबाइल कुरिअरने पाठवित असल्याचे सांगत त्याचा फोटो पाठवला. पुढे वेगवेगळी कारणे करत तरुणाच्याच खात्यातील १ लाख २ हजार ५०० रुपयावर डल्ला मारला. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.