मुंबई : दादर येथील एका नामांकित बँकेच्या एटीएम मशीनमधील त्रुटीचा फायदा घेत ठगाने २ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँक मॅनेजर सुमित विजय थरवळ (३७) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १९ जून रोजी सकाळच्या सुमारास बँक कर्मचारी पैसे काढण्यासाठी गेले. तेव्हा २ लाख रुपये कमी मिळून आले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असताना १८ जून रोजी ए.टी.एम.मधील सी.डी.एम. मशीनमध्ये दोन अनोळखी इसम हे पैसे भरण्याच्या व काढण्याच्या स्लॉटमागे अँटोमेटिक व मॅन्युअल पुढे मागे होणाऱ्या लोखंडी पत्राच्या प्लेटला पकडून व सदर प्लेटच्या तांत्रिक त्रुटींचा फायदा घेऊन, बनावट डेबिट कार्डद्वारे पैसे काढताना दिसले. यात २० वेळा केलेल्या व्यवहारात २ लाख काढण्यात आले आहेत.
त्यानुसार याबाबत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना देण्यात आले आहे. त्या फुटेजनुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.