गुगलवरून कुरिअर कंपनीचा नंबर घेणे पडले लाखाला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 09:56 AM2023-12-11T09:56:40+5:302023-12-11T09:57:09+5:30
वृद्ध महिलेची फसवणुकीनंतर पोलिसात धाव.
मुंबई: बँकेचे स्लिप बुक मागवणे एका वृद्ध महिलेला चांगलेच महागात पडले. ते बुक घरी आणण्यासाठी तिने कुरिअर कंपनीला संपर्क करण्याचा प्रयत्न करताना गुगलवर नंबर शोधला. मात्र, या नंबरापोटी महिलेने तब्बल एक लाख रुपये गमावले. ही बाब लक्षात आल्यानंतर अंधेरी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार नीता नागवेकर (६१) या अंधेरी पूर्व परिसरात आई आणि मुलासह राहतात. त्यांना बँक स्लिप बुक हवे होते. त्यांनी २ ऑगस्ट रोजी एचडीएफसी बँकेकडे यासाठी चौकशी केली होती जे त्यांना ऑगस्ट महिन्यात पाठवले जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र ते न मिळाल्याने त्यांनी पुन्हा चौकशी केली, तेव्हा ते ब्लू डार्ट कुरिअर सर्व्हिसकडून पाठवण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी चौकशी केली आणि गुगलवर नंबर सर्च केला.
१० रुपयांचा दंड अन्...
तेव्हा स्लिप बुकचे स्टेटस जाणून घेण्याकरिता नागवेकर यांनी गुगलवरून कुरिअरचा नंबर शोधला. मिळालेल्या नंबरवर कॉल केल्यावर तो प्रदीपकुमार नावाच्या व्यक्तीने उचलला. तक्रारदाराने त्याला स्लीप बुकबाबत विचारणा केल्यावर तुम्ही कुरिअर रिसिव्ह न केल्याने तुम्हाला १० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, असे सांगितले.
आलेल्या लिंकवर क्लिक केले अन्...
तसेच कुरिअर मिळण्यासाठी एक लिंक पाठविण्यात आली. त्यावर क्लिक केल्यानंतर नागवेकर यांना ओटिपी मिळाला तो शेअर केल्यावर त्यांच्या खात्यातून १० रुपये वजा झाले. दोन दिवसात कुरिअर मिळेल असे सांगितले, मात्र तसे न होता त्यांच्या खात्यातून १ लाख रुपये काढण्यात आले.