लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गुगलवरील ठग आता दुकानातील कर्मचाऱ्यांचीही माहिती ठेवून त्याद्वारेही फसवणूक करत असल्याचा प्रकार माहीममध्ये समोर आला आहे. यात, गुगलवरून मिळविलेल्या क्रमांकावरून ऑनलाइन मद्य मागविणे महिलेला महागात पडले. ठगाने संबंधित दुकानातील कर्मचाऱ्याचे नाव सांगून फसवणूक केली. याप्रकरणी माहीम पोलीस अधिक तपास करत आहेत.
माहीम परिसरात कुटुंबीयांसोबत राहणाऱ्या २८ वर्षीय तक्रारदार यांनी १७ जानेवारी रोजी येथील एल.जे. रोड परिसरातील बाॅम्बे वाइन शाॅपमधून ऑनलाइन मद्य मागवले. त्यांनी गुगलवरून संबंधित शॉपचा क्रमांक मिळवला होता. त्यावर बोलणाऱ्या व्यक्तीने त्याचे नाव नरेन असल्याचे सांगितले. त्यांनी यापूर्वीही येथील शॉपमध्ये गेला असल्याने येथील नरेन नावाच्या व्यक्तीस ओळखत होते. कॉल घेणाऱ्या व्यक्तीने कॅश ऑन डिलिव्हरी होणार नसल्याने ऑनलाइन पेमेंट करण्यास सांगितले. त्यांनी डेबिट कार्डची माहिती देत, मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक सांगितला.
त्याच व्यवहारात त्यांच्या खात्यातून एकूण १६ हजार ८२० रुपये वजा झाले. त्यानंतर पुन्हा ओटीपी पाठवून त्याद्वारे ३१ हजार ७८५ रुपये काढण्याचा संदेश धडकला. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा शुक्रवारी गुन्हा नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.
.......