Join us

तोतया जवानाकडून दुचाकी विक्रीच्या नावाखाली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : फेसबुकवरील स्वस्तात दुचाकी विक्रीची जाहिरात बघून, दुचाकी खरेदी करणे तरुणाला महागात पडले आहे. यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : फेसबुकवरील स्वस्तात दुचाकी विक्रीची जाहिरात बघून, दुचाकी खरेदी करणे तरुणाला महागात पडले आहे. यात सैन्य दलातील जवान असल्याचे भासवून ठगाने तरुणाची ५५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदार तरुण चिराबाजार परिसरात राहत असून तो गेल्या काही दिवसांपासून दुचाकी खरेदीच्या विचारात होता. त्यासाठी शोध सुरू असताना त्याने फेसबुकवर दुचाकी विक्रीची जाहिरात बघितली. त्याखाली असलेल्या संकेतस्थळावरील गाड्या पाहून संबंधित क्रमांकावर संपर्क साधला. समोरील व्यक्तीने आपले नाव अनिलकुमार असल्याचे सांगून तो पुणे येथे सैन्य दलाच्या कँटिनमध्ये नोकरी करत असल्याचे सांगितले. तसेच एका गाडीचे फोटो आणि नोंदणी प्रमाणपत्र तरुणाला पाठविले.

नोंदणी प्रमाणपत्रावरून ही गाडी अनिता विना मेनेझेस या नावाने नोंद असल्याचे तरुणाला समजले. अनिलकुमार याने या दुचाकीची किंमत १८ हजार रुपये असल्याचे रमेशला सांगितले. तसेच त्याने ही दुचाकी सैन्य दलाच्या कुरिअरने रमेश याच्या राहत्या पत्त्यावर पोहोचणार असून त्यानंतर त्यांना गाडीचे पैसे द्यावे लागतील, असे सांगितले.

त्यामुळे तक्रारदाराचा त्याच्यावर विश्वास बसला. त्याने दुचाकी खरेदीसाठी होकार देताच, दुचाकी तक्रारदाराच्या नावावर नोंदणी करण्यासाठी फी म्हणून ४,१५० रुपये, पुढे विकास नावाच्या व्यक्तीने कुरिअरमधून बोलत असल्याचे सांगून दुचाकीचा ट्रान्सपोर्टसाठी जीएसटी चार्ज म्हणून एकूण १८ हजार रुपये उकळले.

दुचाकीच्या ठरलेल्या किमतीएवढी रक्कम गेल्याने रमेशने पुन्हा अनिलकुमार याला कॉल करून याबाबत विचारणा केली. पुढे आणखीन वेगवगेळी कारणे पुढे करत त्याच्याकडून एकूण ५४,९९८ रुपये उकळले. पुढे आणखीन पैशांची मागणी करताच तरुणाला संशय आला. त्याने तत्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.