लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : समाजसेवी संस्थेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या ठगाला गुन्हे शाखेच्या कक्ष २ ने बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
अटक आरोपीने लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या व्यापाऱ्याकडे सामाजिक संस्थेसाठी काम करीत असल्याचे सांगून गरीब विद्यार्थ्यांसाठी ४३ हजार १२० रुपये किमतीच्या ५ हजार ५०० पेनची ऑर्डर दिली. धनादेश देऊन माल खरेदी केला. पुढे खात्यात पैसे नसल्याने धनादेश वठला नाही. यात फसवणूक झाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी गेल्या वर्षी १ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद करीत अधिक तपास सुरू केला. आरोपीला मालाडमधून ताब्यात घेत, त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मुंबई, नवी मुंबई, पालघर परिसरात अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानुसार त्याच्यावर अटकेची कारवाई करीत पुढील तपासासाठी एल. टी. मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.