लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कार खरेदी-विक्री व्यवहारात चांगला नफा मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दाम्पत्याची ५ लाखांना फसवणूक झाली आहे.
पायधुनी परिसरातील ईब्राहिम मर्चंट रोड परिसरात राहण्यास असलेल्या तक्रारदार नसीम यांचा खेळणी ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. यातील आरोपी सलीम नवीवाला याने नसीम यांच्याशी ओळख वाढवून आपला जुन्या चारचाकी गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याचे सांगितले. पुढे ऑगस्ट महिन्यात कार खरेदी करण्यासाठी गळ घातली. कार दिव दमण आरटीओची पासिंग असून, तिची किंमत २ लाख ३० हजार रुपये असल्याचे सांगितले. त्यांनीही विश्वास ठेवून कार खरेदीसाठी दोन लाख रुपये भरले. पुढे सलीम याने वेगवेगळी कारणे देत गाडी देण्यास टाळाटाळ केली. अखेर तक्रारदार यांनी दमण येथे आरटीओ कार्यलयात चौकशी केली असता, कार वापी येथील मुख्तार नावाच्या दलालामार्फत आली असून, सलीम याचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले.
त्यानंतर तक्रारदार यांनी सलीमला कॉल करून दिलेले पैसे परत करण्यास सांगितले. मात्र, सलीम टाळाटाळ करू लागला, तसेच त्याने व्यवसायासाठी घेतलेले पैसेही परत करत नव्हता. अखेर एकंदर ६ लाखांची फसवणूक झाल्याप्रकरणी त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
.........................