मुंबई : उच्चशिक्षणासाठी परदेशात पाठवण्याचे आमिष दाखवत एका महिलेने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार अंबोली पोलिसांच्या हद्दीत घडला. याप्रकरणी तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
तक्रारदार कमलेश कुमार कोठारी यांनी याप्रकरणी अंबोली पोलिसात तक्रार दिली आहे. मुलाच्या उच्चशिक्षणासाठी २३ मे २०२३ पासून ते आतापर्यंत वीणा आंबेकर नावाच्या महिलेने कोठारी यांच्याकडून १ लाख ४५ हजार रुपये उकळले.
आंबेकरने कोठारी यांच्या मुलाला मुंबई ते टोरंटो येथे जाण्याच्या निमित्ताने विमान तिकीट बुकिंग आणि मनी एक्स्चेंजसाठी आगाऊ रक्कम आकारली; मात्र त्यांना विमानासाठी तिकीट उपलब्ध करून दिलेच नाही. कॅनडियन डॉलर ॲक्शनसाठी दिलेले पैसेही परत न करता त्यांना लाखोंचा चुना लावला. याप्रकरणी कोठारी यांनी तक्रार दिल्यावर अंबोली पोलिसांनी आंबेकर विरोधात गुन्हा दाखल केला.