Join us  

वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक; दाेघांना अटक; मुंबईसह दिल्लीत गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 5:19 AM

मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, दिल्ली, उत्तर प्रदेशसह विविध ठिकाणी गुन्हे नोंद आहे.

मुंबई : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळणाऱ्या दुकलीला पोलिसांनी अटक केली आहे. सौरभ कृष्णबिहारी उपाध्याय (४२) आणि सपन श्रीराजकुमार तनेजा (४६) अशी आरोपींची नावे असून, दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, दिल्ली, उत्तर प्रदेशसह विविध ठिकाणी गुन्हे नोंद आहे.

परिमंडळ-१चे पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली जे जे मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय काटे, तपास अधिकारी प्रसाद वागरे यांच्यासह कफ परेड पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी अमित देवकर, रूपेशकुमार भागवत, तसेच अंमलदार यांनी ही कारवाई केली आहे.  तक्रारदार यांच्या मुलीने यावर्षीच नीट परीक्षा उत्तीर्ण केली. ते मुलीच्या पुढील शिक्षणासाठी २६ ऑगस्ट रोजी सौरभ उपाध्याय चालवत असलेल्या नवी दिल्लीतील एज्युपिडिया एज्युकेशन सेंटरमध्ये गेले. तेथे, तनेजाने मुलीचा फाॅर्म भरून ७७०० रुपये पाठविण्यास सांगितले. मुलीला भायखळा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन देत प्रवेशासाठी ४५ लाखांचा खर्च सांगितला. ५ ते ८ सप्टेंबर दरम्यान आरोपीने तक्रारदाराकडून दोन लाख दोन हजार रुपये उकळले.

जेजेच्या ओपीडीत घेतली मुलाखत

            तनेजाच्या सांगण्यावरून तक्रारदार १२ सप्टेंबर रोजी मुलीला घेऊन जेजे वैद्यकीय महाविद्यालयात गेले. तेथे एका व्यक्तीशी त्यांची भेट झाली. तेथून मुलीला जेजे रुग्णालयाच्या मुख्य ओपीडीतील एका डॉक्टरच्या खोलीत नेऊन मुलाखतीचे नाटक वठवण्यात आले.

            तक्रारदाराला संशय आल्याने त्यांनी भागवत यांना माहिती दिली. भागवत यांनी दोन्ही आरोपींना गेट वे ऑफ इंडिया येथून ताब्यात घेतले. दोघेही महाठक असल्याचे उघड होताच त्यांना जेजे मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

            आरोपींनी बँक खात्यात जमा केलेली तक्रारदारांची रक्कम गोठवण्यात आली आहे.

आरोपी सराईत गुन्हेगार

सौरभ उपाध्यायविरुद्ध उत्तर प्रदेशात पाच, दिल्लीतील द्वारका नॉर्थ पोलीस ठाण्यात एक आणि नवी मुंबईच्या नेरूळ पोलिस ठाण्यात एक आदी अनेक गुन्हे दाखल आहेत. तनेजाविरुद्ध उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे एक गुन्हा दाखल आहे.

टॅग्स :धोकेबाजी