गौरी टेंबकर – कलगुटकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सायन रुग्णालयात सर्जन असलेल्या व एक डान्स स्टुडिओ चालवणाऱ्या डॉ. वैदेही वेंकटेश्वरन (२९) यांना व्हॉट्सॲपवर शिकवणीची फी पाठवण्याच्या बहाण्याने २१ हजार ७०० रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला गेला. त्यांनी अंधेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. वैदेही या अंधेरीच्या सहार परिसरात राहतात. डॉ. वैदेही यांनी १४ जुलैपासून अंधेरी परिसरात एक डान्स स्टुडिओ सुरू केला असून ज्याची जाहिरात त्यांनी इंस्टाग्रामवरही केली आहे. १५ ऑगस्ट रोजी रात्री पावणेदोनच्या सुमारास त्यांना एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून अवनी शर्मा या नावाने व्हॉट्सॲप मेसेज आला. मला बेले डान्स शिकायचे असून क्लासची फी किती आहे, अशी विचारणा केली. डॉ. वैदेही यांनी ७०० रुपये असे सांगितल्यानंतर ७ हजार रुपये पे केल्याचा सिस्टिम जनरेटेड असल्याप्रमाणे दिसणारा मेसेज त्यांना मिळाला. त्याने पुन्हा अधिक पैसे टाकले असल्याचे सांगत ६ हजार ३०० रुपये गुगल पे वरून परत पाठवण्याचीही विनंती केली.
डॉक्टरांनी ते पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा त्याच क्रमांकावरून १५ हजार ४०० रुपये पेड केल्याचा गुगल-पे चा स्क्रीनशॉट पाठविला, ते पैसे देखील डॉ. वैदेही यांनी त्या क्रमांकावर परत पाठवले. परंतु तिसऱ्यांदा २८ हजार पाठविल्याचा मेसेज मिळाला, तेव्हा संशय आल्याने बँक खाते तपासले असता कोणतेही पैसे सदर क्रमांकावरून जमा झाल्याचे दिसले नाही. उलट त्यांनाच २१ हजार ७०० रुपयांचा गंडा घातला गेला होता.
मुलीचा डीपी आणि प्लीज...
मला स्क्रीनशॉट पाठवला तेव्हा आम्ही ट्रीप प्लान करत होतो, त्यासाठी मित्राला पैसे पाठवत होते. मात्र तुमचा नंबर पहिला असल्याने तुम्हाला ते पैसे गेले असे मला मेसेजवर सांगण्यात आले. भामट्याच्या डीपीवर एका मुलीचा फोटो असून सतत प्लीज प्लीज असा मेसेज ते पाठवत असल्याने एखादी लहान मुलगी असावी, जी विनंती करत आहे असे वाटून मी पैसे पाठवले आणि फसले. - डॉ. वैदेही वेंकटेश्वरन सर्जन, सायन रुग्णालय.