मुंबई : भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) नावाने काही संकेतस्थळांवर बनावट जाहिराती प्रसारित करून उमेदवारांची फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तरुणांनी अशा प्रकारांपासून सतर्क रहावे, असे आवाहन प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे.
विमानतळ प्राधिकरणातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार, काही अज्ञात संकेतस्थळांवर ''एएआय''मध्ये नोकरभरती सुरू असल्याच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्याचे निदर्शनास आले आहे; मात्र आम्ही अशाप्रकारे नोकरभरती करण्यासाठी कोणत्याही कंपनीला कंत्राट वा अधिकार दिलेले नाहीत. या सर्व जाहिराती फसव्या असून, ''एएआय''चा त्याच्याशी कोणताही संबंध नाही.
भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरभरती करण्याचे नियम ठरलेले आहेत. त्यानुसार ''एएआय''च्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रकाशित केली जाते. अर्ज कुठे करावा, त्याची कालमर्यादा आणि पात्रता यासंबंधी सर्व माहिती त्यात दिलेली असते. त्यामुळे उमेदवारांनी आमच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरच विश्वास ठेवावा. अन्य कोणत्याही संकेतस्थळावर अर्ज करून पैसे भरू नयेत, आपली कागदपत्रे त्यांना सादर करू नयेत. शिवाय कोणत्याही दलालांच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.