सोशल मीडियावरून जाळ्यात ओढून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:07 AM2021-07-30T04:07:02+5:302021-07-30T04:07:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सोशल मीडियावरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. पुढे व्हॉट्सॲप क्रमांक शेअर होताच तरुणीचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सोशल मीडियावरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. पुढे व्हॉट्सॲप क्रमांक शेअर होताच तरुणीचा विवस्त्र अवस्थेतील व्हिडिओ कॉल आला. अश्लील संवाद रंगला आणि तरुणीच्या मधाळ बोलण्याच्या जाळ्यात अडकून तोही विवस्त्र झाला. पुढे याच व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यात ५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
या मंडळींनी २५० हून अधिक जणांचे अश्लील व्हिडिओ वेगवेगळ्या राज्यांमध्ये ८० पेक्षा जास्त लोकांना विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यात देशभरातील उच्चभ्रू तसेच उच्चशिक्षित मंडळी त्यांच्या जाळ्यात अडकली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अशाच प्रकारे फसवणूक करणाऱ्या मंडळीच्या तक्रारी वाढत होत्या. या मंडळींनी फसवणुकीसाठी मुलींच्या नावे ट्वीटरची ५, इंस्टाग्रामची ४ आणि फेसबुकवर ३ असे एकूण १२ फेक अकाउंट उघडले होते.
आतापर्यंत या टोळीने राज्यभरात २५० जणांचे अश्लील व्हिडिओ वेगवेगळ्या राज्यांमध्ये ८० पेक्षा जास्त लोकांना विक्री केले. विक्री करताना स्वतःची ओळख लपवण्यासाठी त्यांनी टेलिग्रामचा वापर केला. या प्रकरणात महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि ओडिशातील ५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असून अधिक तपास सुरू आहे. आरोपीकडून ६ मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत.
नेपाळ कनेक्शन
आरोपींनी सेक्सटॉर्शनद्वारे मिळणारी रक्कम स्वीकारण्यासाठी उघडलेल्या बँक अकाउंटसाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला. तसेच आर्थिक व्यवहारासाठी भारताव्यतिरिक्त नेपाळमधील बँक खात्याचाही वापर करण्यात आला आहे.
अनोळखी व्हिडिओ कॉल घेऊ नका
व्हाॅट्सॲपवर येणारे अनोळखी व्हिडिओ कॉल उचलू नका अथवा त्यावर कुठलाही प्रतिसाद देऊ नका असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.