अ‍ॅपवर नि:शुल्क पाहता येणार उत्तरपत्रिका, विद्यार्थ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 06:16 AM2018-07-18T06:16:20+5:302018-07-18T06:16:35+5:30

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणपत्रिका आपल्या लॉगइन आयडीमध्ये पाहता येतील.

Free Asterisk for Students, Consolation for Students | अ‍ॅपवर नि:शुल्क पाहता येणार उत्तरपत्रिका, विद्यार्थ्यांना दिलासा

अ‍ॅपवर नि:शुल्क पाहता येणार उत्तरपत्रिका, विद्यार्थ्यांना दिलासा

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणपत्रिका आपल्या लॉगइन आयडीमध्ये पाहता येतील. त्यानुसार आपले पेपर पुनर्मूल्यांकनाला द्यायचे की नाहीत, हे ठरवता येणार आहे. विशेष म्हणजे या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मोफत पाहता येतील. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांच्या निकालासंदर्भात मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी ही माहिती दिली. अ‍ॅपवर गुणपत्रिका देण्याचा हा निर्णय विद्यापीठाच्या विचाराधीन आहे.
मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत विद्यार्थ्याला या अ‍ॅपसाठी लॉगइन आयडी आणि पासवर्ड मिळेल. विद्यापीठातील पुढील शैक्षणिक आयुष्यात त्याला यावरून त्याचे हॉल तिकीट, परीक्षांचे वेळापत्रक, निरनिराळे सर्क्युलर्स, सूचना याची माहिती मिळेल. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
या पत्रकार परिषदेत विद्यापीठाच्या निकाल कामांचा आढावा देणारे एक सादरीकरणही परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी केले. या वेळी नवनियुक्त प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी आणि प्रभारी कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे उन्हाळी सत्र परीक्षांचे सर्व निकाल परीक्षा झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत जाहीर करण्यात येतील, असेही या वेळी सांगण्यात आले.
>अद्याप ३३९ निकाल बाकी
एकूण ४९० परीक्षांपैकी १५१ निकाल जाहीर करण्यात आले असून अद्याप ३३९ निकाल जाहीर होणे बाकी आहेत. या निकालात प्रामुख्याने सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विभागातील १५१ निकाल जाहीर होणे बाकी आहेत.
आतापर्यंत एकूण झालेल्या परीक्षांमधून १६ लाख ६२ हजार ७६७ उत्तरपत्रिका तपासणीसाठी उपलब्ध असून त्यापैकी १४ लाख ७६ हजार ३७९ उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या आहेत. तर, १ लाख ८६ हजार ३८८ उत्तरपत्रिका तपासणे बाकी असल्याचे परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी निकालांचा आढावा घेताना सांगितले.

Web Title: Free Asterisk for Students, Consolation for Students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.