विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार मोफत पुस्तके
By Admin | Published: March 16, 2017 03:06 AM2017-03-16T03:06:52+5:302017-03-16T03:06:52+5:30
सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यात येतात. ही पुस्तके न देता बँकेत पैसे जमा करणार असल्याचे आधी
मुंबई : सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यात येतात. ही पुस्तके न देता बँकेत पैसे जमा करणार असल्याचे आधी शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले होते. याला विरोध झाल्याने येत्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत पुस्तके देण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने परिपत्रक काढले आहे. मे महिन्यातच मुख्याध्यापकांना पुस्तके शाळेत देण्यात येणार
आहेत.
मोफत देण्यात येणाऱ्या पुस्तकांचे पैसे बँक खात्यात जमा करण्यात येणार असून सर्व विद्यार्थ्यांची बँक खाती काढण्यात यावीत, असे आदेश सर्व शाळांना देण्यात आले होते. या निर्णयानंतर शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी नाराजी दर्शविली. विविध संघटनांनी विरोध केल्यानंतर तावडे यांनी त्यांच्या वक्तव्यावरून घूमजाव केले होते. पैसे नाही, विद्यार्थ्यांना पुस्तकेच देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतरही काही शाळांत विद्यार्थ्यांची बँक खाती उघडावीत असे फलक लावण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षक आणि प्राध्यापकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, नवीन परिपत्रकातून हा संभ्रम दूर करण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
तावडे यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळतील असा निर्णय घेतल्याने मुख्याध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मुख्याध्यापक संघटनांनी याविषयी शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. (प्रतिनिधी)