रेल्वे स्टेशन, बस स्थानकांत मोफत कोरोना चाचणी, मग विमानतळावर का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:06 AM2021-03-27T04:06:47+5:302021-03-27T04:06:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे चाचण्या वाढविण्यावर भर देण्याची सूचना सरकारने केली आहे. त्यानुसार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे चाचण्या वाढविण्यावर भर देण्याची सूचना सरकारने केली आहे. त्यानुसार रेल्वे स्टेशन, बस स्थानकांसह इतर सार्वजनिक ठिकाणी मोफत कोरोना चाचणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मुंबई विमानतळावर मात्र कोरोना चाचणीसाठी अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जातात. हा दुजाभाव कशासाठी, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार विमान प्रवासासाठी कोरोना चाचणीचा अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. हा अहवाल ७२ तासांसाठी वैध मानला जातो. ज्या प्रवाशांकडे कोरोना चाचणीचा अहवाल नसेल त्यांना विमानतळावर चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी ८५० रुपये शुल्क आकारले जाते. ८ ते २४ तासांत हा अहवाल प्रवाशाच्या मोबाइलवर पाठविला जातो. तत्काळ अहवाल हवा असल्यास ४५०० रुपये भरावे लागतात. ही प्रवाशांची लूट नव्हे का, असा सवाल श्याम दांगट या प्रवाशाने उपस्थित केला. आधीच विमान इंधन महागल्याने तिकिटांचे दर वाढले, त्यात कोरोना चाचणीच्या शुल्कामुळे प्रवाशांच्या माथी दुहेरी भुर्दंड बसत असल्याचे त्यांनी नमूद केले.
चाचण्यांसाठी किती दर आकारावा, ही बाब शासनाच्या अखत्यारित येते. त्यांनी सूचना दिल्याप्रमाणे शुल्क आकारले जाते. मुंबई विमानतळावरील कोविड व्यवस्थापन पूर्णतः पालिकेच्या हातात असल्यामुळे प्रवाशांना मोफत चाचणी सुविधा उपलब्ध करून देण्यासंबंधी तेच निर्णय घेऊ शकतात, अशी प्रतिक्रिया मुंबई विमानतळाशी संबंधित प्रतिनिधींनी व्यक्त केली.
..............................
शासनाच्या सूचनेनुसार विमानतळावर कोरोना चाचणीसाठी ८५० रुपये शुल्क आकारले जाते. तत्काळ अहवालासाठी ४५०० रुपये घेतले जात असल्याचे ऐकिवात नाही.
-देवेंद्र कुमार जैन, सहआयुक्त, मुंबई महानगरपालिका.
...........................
स्वॅब घेतल्यानंतर प्रवाशांना बाहेर जाण्याची मुभा
-कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेतल्यानंतर प्रवाशांना बाहेर जाण्याची मुभा दिली जाते. ८ ते २४ तासांत प्रवाशाच्या मोबाइलवर अहवाल पाठविला जातो. पॉझिटिव्ह असल्यास विलगीकरणात जाण्याची सूचना केली जाते.
-बाहेर सोडलेल्या प्रवाशाला आधीच कोरोनाची लागण झालेली असल्यास अहवाल मिळेपर्यंत त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला धोका निर्माण होऊ शकतो, याचा विचार शासन करीत नाही का?
-याबाबत विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सांगितले की, येथून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. प्रत्येकाला अहवाल मिळेपर्यंत बसवून ठेवल्यास विमानतळावर मोठी गर्दी होईल आणि अंतर नियम पाळणे शक्य होणार नाही. त्यामुळे स्वॅब घेतल्यानंतर प्रवाशांना बाहेर जाण्याची परवानगी दिली जाते.
..............
तत्काळ अहवालासाठी ४५०० रुपये; पालिका अनभिज्ञ
मुंबई विमानतळावर कोरोना चाचणीच्या तत्काळ अहवालासाठी ४५०० रुपये घेतले जातात, याबाबत पालिका अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. चाचणीसाठी ८५० रुपये घेतात हे माहीत होते; परंतु, ४५०० रुपयांबाबत ऐकिवात नाही, अशी प्रतिक्रिया सहआयुक्त देवेंद्र कुमार जैन यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. मात्र, मुंबई विमानतळ प्रशासनाच्या ५ मार्च २०२१ च्या प्रसिद्धीपत्रकात तत्काळ अहवालासाठी ४५०० रुपये आकारले जात असल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो.