Join us

Corona Vaccination: मुंबईतील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करावे; भाजप नेत्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 1:17 PM

Atul Bhatkhalkar demand on Corona Vaccine: आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. 2011 च्या जनगणनेनुसार मुंबईत 18 ते 44 वर्षे वयोगटातील सुमारे 58 लाख 50 हजार लोकसंख्या असून त्यांच्या करिता लागणारी लस विकत घेण्यासाठी सुमारे 352 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

मुंबई - कोरोना महामारीच्या सुरुवातीपासूनच राज्यासह देशातील सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईकरिता विशेष अभियान राबवून संपूर्ण मोफत व जलद लसीकरण करण्याची आवश्यकता आहे. मुंबई महानगरपालिकेकडे 70 हजार कोटीं रुपयांच्या ठेवी असून आर्थिक स्थिती सुद्धा सक्षम आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेमार्फत लस खरेदी करून मुंबईतील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करावे अशी आग्रही मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

2011 च्या जनगणनेनुसार मुंबईत 18 ते 44 वर्षे वयोगटातील सुमारे 58 लाख 50 हजार लोकसंख्या असून त्यांच्या करिता लागणारी लस विकत घेण्यासाठी सुमारे 352 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडून 45 वर्ष वयापेक्षा वरील नागरिकांचे मोफत लसीकरण केले जात आहे. त्यामुळे 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मोफत करण्याची आवश्यकता आहे. या लसीकरण मोहिमेसाठी लागणारा इतर खर्च व व्यवस्था करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येऊन मदत करतील. तसेच, ज्या नागरिकांकडे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आधार कार्ड किंवा रहिवासी पुरावा असेल अशा व्यक्तींचे यातून प्राधान्यने लसीकरण केल्यास पुढील काही महिन्यात हे लसीकरण पूर्ण होऊन मुंबई कोरोना मुक्त करता येईल.

मुंबईत कोरोनाची तिसरी व चौथी लाट येणार असून रुग्णसंख्या अधिक वाढण्याची भीती लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेतर्फे तात्काळ ही लस खरेदी करावी अशी मागणी सुद्धा आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

टॅग्स :कोरोनाची लसअतुल भातखळकर