Join us

कोरोनामुळे पालक गमावलेल्यांना बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:07 AM

इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेचा निर्णय : नोकरी गमावलेल्यांनाही शुल्कात सवलतलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या ...

इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेचा निर्णय : नोकरी गमावलेल्यांनाही शुल्कात सवलत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत, यासाठी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) या संघटनेने अशा विद्यार्थ्यांना बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे आर्थिक परिस्थिती ढासळली आहे, अशा गरजू पालकांच्या मुलांनाही शालेय शुल्कात २५ टक्के सवलतीचा निर्णय जाहीर केला आहे.

मेस्टा संघटनेची राज्यस्तरीय बैठक नुकतीच झाली. यात शाळांसमोरील अडचणींसोबत पालकांच्या समस्यांवरही चर्चा झाली. त्या पार्श्वभूमीवर संघटनेने हा निर्णय घेतल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी दिली. शाळांच्याही समस्या पालकांनी समजून घ्याव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. संस्थाचालकांचेही वीजबिल आणि अन्य पायाभूत सुविधांसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते थकले आहेत, त्यामुळे बँका शाळांच्या इमारती जप्त करत आहेत. पालकांनी शाळा, संस्थाचालकांच्या अडचणीही लक्षात घेण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. सरकारने पालक आणि शाळा संस्थाचालक यांच्यासोबत बैठक घेऊन सर्वसमावेशक तोडगा काढावा, सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत. अन्यथा राज्यातील सर्व इंग्रजी शाळा बेमुदत बंद करण्याची हाक द्यावी लागेल, यामुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानाला सरकारच जबाबदार असेल, असेही ते म्हणाले.

शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशाची प्रतिपूर्ती तीन वर्षांपासून दिलेली नाही. इंग्रजी संस्थाचालकांचे कोट्यवधी रूपये शासनाकडे पडून आहेत. त्यातच काही सधन पालकांकडून शुल्काचे हप्तेही थकवले जात आहेत. अशास्थितीत शिक्षकांचे पगार, सोयी - सुविधांचा, मेंटेनन्सचा खर्च कसा करायचा? असा प्रश्न संस्थाचालकांनी उपस्थित केला. शिक्षण थांबलेले नाही मग अशावेळी शिक्षकांचे पगार तरी का बुडवले जात आहेत, अशा प्रतिक्रियाही बैठकीत उमटल्या.