शिक्षण विभाग; पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रस्ताव
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे आईवडील कोरोनामुळे गमवावे लागले आहेत, त्यांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यास शालेय शिक्षण विभागाने तयारी दाखविली आहे. पहिली ते बारावीपर्यंतच्या अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याचे नियाेजन त्यांनी केले असून यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडला आहे.
कोरोना काळात अनेक विद्यार्थ्यांच्या आईवडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. काेराेनामुळेे आधीच मानसिकतेवर झालेला आघात आणि त्यातच आईवडिलांचा आधारही हरपल्याने या विद्यार्थ्यांची स्थिती दयनीय आहे. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांना मदत करणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे मत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रस्तावात मांडले. याच पार्श्वभूमीवर पहिली ते बारावीतील अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीच्या नियोजनाचा प्रस्ताव मांडल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली. या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागानेही अशी मदत करण्याचे आवाहन त्यांनी ट्विटरद्वारे केले.
..................................