Join us

दोन दिवस पाण्यात बुडल्यास मोफत अन्नधान्य, पूरग्रस्तांची सरकारकडून क्रूर थट्टा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 2:22 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनं सांगली, सातारा आणि कोल्हापुरातील पूरग्रस्तांची क्रूर थट्टा चालवली आहे.

मुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनं सांगली, सातारा आणि कोल्हापुरातील पूरग्रस्तांची क्रूर थट्टा चालवली आहे. सरकारनं परिपत्रक काढून दोन दिवस पाण्यात बुडल्यास 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ मोफत मिळणार असल्याचं जाहीर केलं आहे. या काढलेल्या जीआरनंतर सरकारवर चहूबाजूंनी टीका केली जात आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्धभवून दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी क्षेत्र पाण्यात बुडलेले असल्यास निराधार होणाऱ्या कुटुंबांना प्रति कुटुंब 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ मोफत देण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे.एकीकडे राज्यभरातून पूरग्रस्तांसाठी मदतीचे अनेक हात पुढे येत असताना सरकारनं अशा पद्धतीनं जीआर काढून पूरग्रस्तांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार चालवल्याची संतप्त भावना जनतेकडून व्यक्त केली जात आहे. दोन दिवस क्षेत्र पाण्याखाली बुडलं असल्यावरच अन्नधान्य मोफत देण्याच्या अटी-शर्थी म्हणजे लोकांच्या जखमेवर मीठ चोळणारा प्रकार असल्याची भावना अनेकांनी मांडली आहे. लोकांना मदत करण्याऐवजी असे जीआर काढून पूरग्रस्तांची थट्टा चालवल्यानं जनतेतून तीव्र संताप व्यक्त होतोय. दोन दिवस लोकांना पुरात क्षेत्र बुडल्याचे पुरावे मागणार आहात का, समाजमाध्यमातून अशा प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत.

सरसकट सर्वांना मदत करणं अपेक्षित असताना असे जीआर का काढले जात आहेत, असा प्रश्नही जयंत पाटलांनी विचारला आहे. पूरग्रस्तांची सरकारनं थट्टा करू नये अशी आमची अपेक्षा आहे. दोन दिवस जमीन पाण्याखाली राहिल्यास शेतकऱ्यांना पुन्हा नव्यानं शेती करावी लागणार आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला सरकारनं वाऱ्यावर सोडलं आहे. लोकांना मदतीचा हात देण्याऐवजी मंत्री सेल्फी काढत फिरत असल्याचं पाहिल्यानंतर मन उद्विग्न होत असल्याची भावनाही जयंत पाटलांनी व्यक्त केली.    

टॅग्स :देवेंद्र फडणवीससातारा पूरसांगली पूरकोल्हापूर पूर